डेव्हिड ससून या बालसुधारगृहात एका विधी संघर्ष बालकाची चौघांनी मिळून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी,17 आॅगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात चार विधी संघर्ष बालकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी एक जण हत्येच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात आहे.
हसवान निशाद (१६) असे हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ६ ऑगस्ट रोजी निशाद हा डी.बी. मार्ग पोलिसांना गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरताना मिळाला होता. त्याला सरंक्षणाची गरज असल्यामुळे पोलिसांनी त्याला प्रथम बाल कल्याण समिती समोर हजर केले. बाल कल्याण समितीने त्याला माटुंगा रोड येथील डेव्हिड ससून औद्योगिक बालसुधारगृह ८ ऑगस्ट रोजी येथे दाखल केले होते.
निषादला विलगीकरण कक्षात ठेवलेले
डेव्हिड ससून बालसुधारगृहातील विलगीकरण कक्षात निषाद याला ठेवण्यात आले होते. निषाद हा कुणाशी काही बोलत नव्हता. बाल सुधारगृहातील अधिकारी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निषाद हा बेशुद्ध अवस्थेत तेथील कर्मचारी यांना मिळाला असता कर्मचारी यांनी याबाबत डेव्हिड ससून बालसुधारगृहाचे अधिकारी यांना कळविले, त्याला तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
(हेही वाचा मुंबईत दहीहंडीचा मनोरा उभारताना १२ गोविंदांना दुखापत)
लाथाबुक्यांनी मारहाण केली
याबाबत बालसुधारगृहतील अधिकारी यांनी शिवाजी पार्क पोलिसांना कळविले. पोलिसांनी प्रथम अपमृत्युची नोंद करून सुधारगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात बालसुधार गृहात असलेले चार विधी संघर्ष बालकांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community