देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवल्यानंतर मोठ्या उत्साहात गोविंदा पथक हे आपले थर लावण्यासाठी दादर येथे आले आहेत. मात्र अयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रूग्णवाहिका अडकून पडल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – जखमी गोविंदांवर मोफत उपचार! शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आदेश)
मिळालेल्या माहितीनुसार, दादर पश्चिम येथील आयडियल गल्ली येथील श्री साई दत्त मित्र मंडळाने दहीहंडी आयोजित केली आहे. या मित्रमंडळाच्या दहीहंडीत ही घटना घडली आहे. गोविंदा पथकाने थर लावून उतरेपर्यंत रूग्णवाहिका एकाच जागी उभी होती. मात्र गोविंदा पथकाने आपले थर काही उतरवले नाहीत. ज्यावेळी रूग्णावाहिका गर्दीत अडकून होती त्यावेळी गोविंदांचे थरांवर लक्ष होते तर आयोजकही निष्क्रिय असल्याचे पाहायला मिळाले.
ही रूग्णवाहिका माणसांच्या गर्दीत अडकून पडल्यानंतर आयोजकांनी देखील या रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. यामुळे आयोजकांवर नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Join Our WhatsApp Community