राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारवर आगपखड करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने देखील राजकीय थरांच्या चढाओढीतही चांगलीच स्पर्धा रंगली आहे. भाजपचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना काळातही देशभरात सर्व हिंदु सण मोठ्या उत्साहात साजरे होत असताना महाराष्ट्रात मात्र या सणांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ठाकरे सरकार हे हिंदुविरोधी सरकार होते, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
हिंदू सणांचा उत्साह पहायला मिळतोय
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने नवाब मलिकांशी मैत्री केली आणि ते गणपती उत्सव विसरले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना गोपाळकाला दहीहंडी उत्सव देखील साजरा करायला विसरली. पण आता राज्यातील आणि मुंबईतील जनतेने शिवसेनेला सोडून भाजपला जवळ केलं आहे. आमच्या हिंदू सणांवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण आज सरकार बदललं असून तरुणाईचा आणि हिंदू सणांचा उत्साह पुन्हा एकदा पहायला मिळत आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबईतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार- फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यात येत आहे. आता मुंबई महापालिकेतही आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यासाठी सज्ज झालो आहोत. ही हंडी फोडून विकासरुपी मलाई आम्ही गरीबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरोधात हल्लाबोल केला आहे. मुंबई भाजप कडून जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता, या उत्सवाला फडणवीसांनी हजेरी लावली होती.
Join Our WhatsApp Community