ठाकरे सरकारच्या काळात वर्षा आणि सह्याद्रीच्या वाऱ्या करणाऱ्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक असलेल्या इक्बालसिंह चहल यांचे आता महापालिकेत मन रमताना दिसत आहे. यापूर्वीच्या सरकारमधील मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या एकछत्री कारभार करणाऱ्या चहल यांना आता नवीन सरकारमधील अनेकांच्या हस्तक्षेपामुळे बदली आणि त्या बदली रद्द करण्यातच जास्त वेळ जात असल्याने कंटाळलेल्या चहल यांच्यावर आता मला महापालिकेतून मुक्त करा असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सरकारची छाप असलेल्या चहल यांनीही जुन्या सरकारची ओळख पुसण्यासाठी नवीन सरकारची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून येणाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यासाठी तत्परता दाखवली जात आहे आणि पुन्हा त्यांनी बदली रद्द करुनही सरकारची मर्जी राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
( हेही वाचा : गोविंदांना विमा जाहीर केला, पण दहीहंडी सरली तरी प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात नाही)
मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी मागील एक महिन्यांमध्ये सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांच्या मोठ्याप्रमाणात बदल्या केल्या. परंतु त्यातील आजवर काढलेल्या सर्व बदल्या बदलण्यात आल्या असून यामुळे महापालिका प्रशासक असलेल्या चहल यांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ जागी केल्यांनतर पुन्हा त्यांची बदली रद्द करून त्यांना एन विभागाच्य सहायक आयुक्तपदी आणले गेले. त्यानंतर उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ संगीता हसनाळे यांची बदली परिमंडळ एकमध्ये केल्यांनतर चारच दिवसांमध्ये बदली रद्द करण्याची नामुष्की आली. हसनाळे यांच्याकडे पुन्हा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार सोपवताना परिमंडळ एकचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला.
तर किरण दिघावकर, महेश पाटील, स्वप्नजा क्षिरसागर आदींनी अद्यापही बदलीच्या ठिकाणांचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानंतरही बदलीच्या ठिकाणी अधिकारी जात नाही किंवा बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असतानाही बदलीचे निर्णय तडकाफडकी घेऊन रद्द करण्याचेही निर्णय तेवढ्या जलदगतीने घेतले जात असल्याचे पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सहायक आयुक्त व उपायुक्तांची बदली न करण्याची एक प्रथा आहे. परंतु प्रशासक असलेल्या चहल यांनी सरकारच्या मर्जीतील लोकांना खुश ठेवण्यासाठी त्यांना न आवडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदली करण्याचा सपाटाच लावला आहे. मात्र, या बदली केल्यानंतरही त्या रद्द केल्या जात असल्याने प्रशासक म्हणून चहल हे अकार्यक्षम ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेत मागील २० वर्षांमध्ये करून श्रीवास्तव, जॉनी जोसेफ, स्वाधीन क्षत्रिय, डॉ जयराज फाटक, सुबोध कुमार, सीताराम कुंटे, प्रवीणसिंह परदेशी आदी आयुक्त होऊन गेले. त्यांनीही राज्यातील सरकारमधील पक्षांशी जुळवून घेतले. परंतु कधीही सरकारकडून शिफारस झाल्यास परस्पर निर्णय घेतले नाही. उलट प्रत्यक्षात सरकारला विश्वासात घेऊन त्यांना याबाबतचा निर्णय का घेतला जाऊ शकत नाही असे समजावून सांगितले जायचे. परंतु आता सरकारला पाठिंबा देणाऱ्या महापालिकेतील एका वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यानेच सर्वांच्या बदल्या होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
आयुक्तांकडून सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांच्या बदल्या केल्या जात असल्याने आता अधिकाऱ्यांमध्येच प्रचंड नाराजी पसरलेली असून एकदा सांगा आम्ही घरी बसतो असा त्रागा आता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांच्या मर्जीतील नेते अशाप्रकारे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करत असल्याने या बदली सत्रामुळे महापालिकेत काम करायचे तरी कसे असा प्रश्नच सर्व कर्मचाऱ्यांना पडू लागला आहे.
Join Our WhatsApp Community