राज्यात ३ वर्षांत ८७ हजार अपघात; ३७ हजार ८८५ मृत्यू

154
राज्यात होणाऱ्या रस्ते अपघातात दरवर्षी सरासरी १३ हजार जणांना जीवाला मुकावे लागत आहे. तसेच हजारो जण अपघातात जखमी होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील सहा महिन्यांत राज्यभरात झालेल्या अपघातात ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील खड्डे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, लेन कटिंग करणे, ओव्हरटेक  करणे हे अपघातांना कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील महामार्गावर होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेत आले.  मेटे यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याची शक्यता अनेक जण वर्तवत असले तरी ओव्हरस्पिडिंग ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला असल्याचे विनायक मेटे यांच्या वाहनावरील चालक एकनाथ कदम याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. या अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मागील साडेतीन वर्षांतील अपघाताची संख्या

राज्य महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१९ ते जून २०२२ या साडे तीन वर्षांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ४ हजार ६५४ अपघात झाले.  त्यात ४५ हजार ९५३ जणांचा मृत्यू झाला असून, ८२ हजार ८३६ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते जून २०२२ या अवघ्या सहा महिन्यांत राज्यभरात १७ हजार २७५ अपघात झाले असून, त्यात ८ हजार ६८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १४ हजार २०० जण जखमी आहेत. वर्षाला रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्याची संख्या सरासरी १३ हजार आहे.
मेटे यांच्या वाहनाला मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर होणाऱ्या अपघातांची अनेक कारणे पुढे येत आहे. महामार्ग पोलीस यंत्रणेसह महामार्गावर टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांवर बोट दाखवले जात आहे. महामार्गावर अपघात झाल्यास त्वरीत अपघातास्थळी रुग्णवाहिका आणि मदत पाठवणे टोल कंपन्याची जवाबदारी असते तर महामार्गावर गस्त घालून वाहतूक कोंडी सोडवणे, एखादे वाहन बंद पडल्यास वाहन चालकाला मदत करून वाहन रस्त्याच्या कडेला आणणे, महामार्गावरील वाहतूक नियंत्रित ठेवणे अपघात होऊ नये याची काळजी घेणे, आणि अपघात झाल्यास जखमींना तत्काळ मदत करून वाहतूक कोंडी सोडवणे इत्यादी जवाबदारी महामार्ग पोलिसांकडे आहे. मात्र महामार्ग पोलीस आणि टोल कंपन्या आपल्या जवाबदाऱ्या पार पाडतात का?  अपघात झाल्यावर मदत उशिरा आल्याची तक्रार वाहन चालकांची असते विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला, त्यावेळी देखील चालक कदम याने मदत लवकर मिळाली नसल्याचे म्हटले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.