शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत, ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आमच्याबद्दल सर्वत्र काहीही बोलत आहेत. पण आता आमचा प्रत्येक प्रवक्ता त्यांना उत्तर देईल. कारण आम्ही काही बोललो नाही तर लोकांना त्यांचं खरं वाटायचं. म्हणून आता आम्ही सर्व बोलणार. पण आम्ही त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलणार नाही, असे केसरकर म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले की, महापालिकेत भाजपची सत्ता 2017 साली आली असती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा मान ठेवून काही केले नाही, असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शनिवारी केला. तसेच, भाजप आणि शिंदे गट युती करणार आहे. दोघेही मिळून 150 पेक्षा अधिक जागा निवडून आणू. आमची युती आता कायम राहणार आहे, आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, असेही केसरकर म्हणाले.
शिवसंवाद नाही तर ही विसंवाद यात्रा
केसरकर म्हणाले की, राज्यात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. ही शिवसंवाद नाही तर विसंवाद यात्रा आहे. छत्रपतींबद्दल ज्यांनी करार पत्र लिहून घेण्याचे काम केले. ते यात्रा शिवाजी महाराजांच्या नावाने करत आहेत. तुम्ही जो शब्द वापरता त्याचा विचार तुम्ही देखील करा. तुम्ही लोकप्रतिनीधींचा अनादर करता, असे केसरकर म्हणाले. सहजासहजी कुणी आपली पदे सोडत नाहीत. आम्ही आमची पदे दावाला लावली. सहजासहजी कोणी न्यायालयात जात नाही. पण आम्ही गेलो. न्यायालयात निर्णय होईलच, असेही केसरकर म्हणाले.
( हेही वाचा: गोविंदा आरक्षणासारखे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात- अजित पवार )
महाराष्ट्रात गोबेल्सची नीती वापरली जातेय
बाळासाहेबांची इच्छा नसणा-या लोकांसोबत सत्ता बनवली. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुलगा आणि वडील मंत्री झाले नाहीत. ते यांनी घडवले, असेही केसरकर म्हणाले. यांना लोकशीहीची परंपरा तोडावी लागली. आदित्य ठाकरे खोटं पसरवत आहेत. गोबेल्सची नीती ते वापरत आहेत. महाराष्ट्रात गोबेल्स तयार होऊ नयेत, असेही ते म्हणाले.