गाड्यांना चमकणारे टायर्स असते तर किती भारी वाटलं असतं ना. गुडइयरचे गणित जर चुकले नसते, तर आज आपल्या गाड्यांना चमकणारे टायर्स असते. त्याचं झालं असं की, 1961 मध्ये गुडइयर कंपनीने चमकणा-या चाकांची निर्मिती केली होती. मात्र, काही अडचणींमुळे त्यांना हा प्रयोग पुढे सुरु ठेवता आला नाही. नाहीतर आज आपल्या गाड्यांना चमकणारी चाके असती. कशी होती ही चमकणारी चाके आणि त्यांची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया.
1950 आणि 60 च्या दशकात अनेक पाश्चात्य गोष्टींचे जगभरातील लोकांना आकर्षण होते. फास्ट फूड, राॅक म्युजिक आणि यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाड्या. अमेरिकेन लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार म्हणून ऑटोमोबईलमध्ये रस घेतला. त्यातच अमेरिकास्थित गुडइयर कंपनीने टायर निर्मीतीमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली.
गुडइयरचे केमिस्ट विल्यम लार्सन यांनी कर्मचारी अॅंथोनी फिनेली यांच्याबरोबर मिळून नियोथेन नावाचे पाॅलीयुरेथेन कंपाऊंड तयार केले. ज्यामुळे गुडइयर ट्युबलेस आणि काॅर्डलेस टायर तयार करणे शक्य होणार होते. त्या टायर्समध्ये भरपूर प्रमाणात रंगद्रव्ये दिसत होती.
गुडइयरचे हे अर्धपारदर्शक टायर कोणत्याही रंगात तयार करणे शक्य होते. या टायर्समधून प्रकाश आरपार जाऊ शकत होता आणि हीच गोष्ट त्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवत होती. इंजिनिअर्सनी चाकाच्या मध्यभागी 18 बल्बसही बसवले. त्या बल्बचा प्रकाश अर्धपारदर्शक टायर्समधून बाहेर येत असे.
या टायर्सची निर्मीती केल्यानंतर गुडइयरने लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. डाॅज पोलारा या गाडीला लाल रंगाचे टायर्स लावून त्यांनी ती गाडी संपूर्ण मायामी शहरात फिरवली. पण गुडइयरने हे टायर अधिकृतपणे कधीही विक्रीसाठी उपलब्ध केले नाहीत. आता हे टायर्स वापरात का आले नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे असे झाले की, हे आकर्षित टायर्स म्हणजे खूप मोठा खर्च. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर ते जास्त उपयुक्त नव्हते. काही मैलांचा प्रवास केल्यानंतर रस्त्याची धूळ टायरवर बसून त्यातून येणारा प्रकाश लुप्त होत असे. याशिवाय सुरक्षेचाही प्रश्न होता. टायरमध्ये वापरल्या जाणा-या कंपाऊंडमध्ये पावासाळी हवामानात पुरेशी पकड नसायची, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण नक्कीच वाढले असते. त्यामुळे दहावर्ष या टायर्सवर काम करुनही गुडइयर या कंपनीला हा प्रयोग मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात उतरवता आला नाही.
Join Our WhatsApp Community