मुंबई हल्ला धमकी प्रकरणः सात क्रमांकांपैकी एक क्रमांक यूपी एटीएस अधिकाऱ्याचा

144

मुंबई पोलिस वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअपवर आलेल्या धमकीचा मेसेज शेअर करण्यात आलेल्या ७ मोबाईल क्रमांकांपैकी एक क्रमांक यूपी एटीएसच्या अधिकाऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांकडून या क्रमांकावर फोन करून खात्री करण्यात आलेली आहे. उर्वरित इतर क्रमांक वेगवेगळ्या राज्यातील तपास यंत्रणांचे असल्याचे समजते. मात्र ज्या क्रमांकावरून मेसेज करण्यात आला तो क्रमांक पाकिस्तानमधील नागरिकाचा असून त्याचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्याच्यावरून मेसेज पाठविण्यात आले असल्याचे समोर येत आहे.

७ जणांचे मोबाईल क्रमांक

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रंमाकावरून धमकीचे मेसेज पाठविण्यात आले होते. या मेसेज मध्ये मुंबईत पुन्हा एकदा २६/११ सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. आलेला मेसेज हा पाकिस्तानी क्रमांकावरून आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यासाठी भारतातील ७ जणांची मदत घेतली जाणार असल्याचे म्हटले असून, मेसेजमध्ये त्या ७ जणांचे मोबाईल क्रमांक शेअर करण्यात आले होते.

(हेही वाचाः मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या धमकीबाबत मुंबई पोलिस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया)

उत्तर प्रदेश एटीएसमधील अधिका-याचा क्रमांक

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यापैकी एक क्रमांक उत्तर प्रदेश पोलिस दलातील एटीएसच्या एका अधिकाऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. मेसेज करणा-याने शेअर केलेल्या मोबाईल क्रमांकाशी मुंबई पोलिसांकडून संपर्क करण्यात आला होता. त्यातील एक क्रमांक उत्तर प्रदेश एटीएस मधल्या अधिकाऱ्याचा निघाला असून, या अधिकाऱ्याने आम्ही मुंबई पोलिस,महाराष्ट्र एटीएसच्या संपर्कात आहोत, आमची काहीही मदत लागल्यास आम्ही सहकार्य करू असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.