दादरमधील प्रसिद्ध सुविधा या शोरूमच्या मालकाच्या ४६ वर्षीय मुलाने विरारमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत कल्पेश मारू हा १५ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता, मात्र गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह विरारमध्ये आढळून आला. मांडवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नैराश्यातून घेतला निर्णय
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूला नैराश्याने ग्रासले असून त्याच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वीही तो अनेकवेळा त्याच्या घरातून पळून गेला होता आणि पोलिसांच्या मदतीने त्याला परत आणण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की मारूने त्याच्या वडिलांचा व्यवसाय न करता अनेक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नसल्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. त्यात त्याला मद्याचे आणि सिगारेटचे व्यसन जडले होते. नैराश्यातून त्याने यापूर्वी स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता.
(हेही वाचाः मुंबई हल्ला धमकी प्रकरणः सात क्रमांकांपैकी एक क्रमांक यूपी एटीएस अधिकाऱ्याचा)
अनेक वर्षांपासून उपचार
जेव्हा त्याला नैराश्य येत असे, तेव्हा तो घर सोडून निघून जायचा असे मारू यांच्या एका नातलगाने म्हटले आहे.
२००८ मध्ये तो निघून गेला आणि अनेक महिन्यांनी सापडला. कल्पेश मारू याच्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते यामुळे त्याचे वडील शांतीलाल मारू आणि आई निर्मलाबेन खूप चिंतेत होते. गेल्या चार महिन्यांत कल्पेशच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्याने धूम्रपान सोडले होते, तो त्याच्या तब्येतीची काळजी घेत होता आणि त्याच्या डॉक्टरांनाही नियमित भेटत होता. १४ ऑगस्ट रोजी तो जाण्याच्या एक दिवस आधी त्याने त्याचे वडील शांतीलाल यांचा वाढदिवसही साजरा केला.
पोलिसांनी दिली माहिती
तो नियमितपणे विरारला दर्शनासाठी जात असे त्यातून त्याला बरे वाटायचे. सोमवारी (१५ ऑगस्ट) देखील, त्याने दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. परंतु परत आला नाही, नेहमीप्रमाणे तो परत येईल म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मांडवी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की शिरसाट फाटा, विरार येथील पेट्रोल पंपाजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून आहे. आम्ही तिथे गेलो आणि त्याला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.
कोल्ड्रिंकच्या बाटलीत मद्य
पोलिसांना त्याच्या खिशातून त्याचे आधार कार्ड सापडले आणि त्यांनी दादर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. मांडवी पोलिसांना घटनास्थळी औषधांची पाकिटे आणि कोल्डड्रिंकची बाटलीही सापडली होती. कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये मद्य मिसळलेले होते त्यात काही गोळ्या टाकण्यात आलेल्या होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून, मृत्यूचे कारण अहवालानंतर समोर येईल, असे पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले.
कल्पेश हा नैराश्यग्रस्त होता हे कुटुंबीयांकडून कळल्याचे वाघ यांनी सांगितले. स्वतःला संपविण्यासाठी त्याने औषधाचा ओव्हरडोस घेतल्याचा संशय असून फॉरेन्सिक चाचणीसाठी बाटलीतील सामुग्रीचे नमुने देखील पाठवले आहेत असे वाघ यांनी सांगितले. कल्पेश मारूच्या पश्चात त्याची पत्नी रचना आणि मुलगा आरव आहे. मुलगा आरव हा पुढील महिन्यात लंडनला शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहे.
Join Our WhatsApp Community