फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली: उद्धव ठाकरे

118

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना उद्धव सेनेवर प्रखर टीका केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले असून, फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली देण्यासारखे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फडणवीसांची टीका

षण्मुखानंद सभागृहामध्ये झालेल्या भाजप पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, मुंबईकरांच्या मनातील जे स्वप्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले हाते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. कारण बाळासाहेबांचे नाव सांगून जे निवडून आले, त्यांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. ते इतके आत्ममग्न होते, की स्वतःच्या पलीकडे अन्य काही पाहू शकले नाहीत. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे. मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता. पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावले मागे आलो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

फडणवीसांचा केविलवाणा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित झाले आहे. मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे,अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः मलबार हिलमधील बंगल्यांच्या वाटपातही भाजपचे पारडे जड)

भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे, त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची, असाच हा प्रकार. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईलच, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

डायलॉग तरी बदला

निवडणुका जवळ आल्यावर आता भावनिक मुद्द्यांचा आधार घेतला जाईल. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र, दिल्लीश्वरांसमोर झुकले वगैरे आरोप होतील. पण त्यांनाही माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडले जाणार नाही. मुद्दाम भ्रम निर्माण केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

दिल्लीत गेल्याशिवाय कामं कशी होणार?

मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर ते दिल्लीश्वरांसमोर झुकले, असा आरोप करतात. पण एवढे दिवस काँग्रेसचे काय, शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशीही दिल्लीत जायचे, त्याचे काय. दिल्लीत जावेच लागते, कारण ती देशाची राजकीय राजधानी आहे. त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील? तुम्ही दिल्लीत गेलात, पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी. काही झाले तरी मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि मला जितक्या वेळा दिल्लीला जावे लागेल, तितके वेळा जाऊ आणि प्रकल्पांना मान्यता आणू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.