मुंबई हल्ला धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी वसई येथून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही वसई येथे सलून चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअप क्रमांकावर आलेल्या धमकीच्या मेसेजबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात येत आहे. परंतु याबाबत मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे.
मुंबई पोलिसांनी घेतली दखल
मुंबई वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअपवर शुक्रवारी रात्री आलेल्या धमकीच्या मेसेजने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. मेसेज करणाऱ्याने मुंबईत २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिली आहे. तसेच काही मोबाईल नंबर शेअर करून भारतातील ७ जण यासाठी मदत करणार असल्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास देण्यात आला आहे. तसेच राज्य एटीएस विभागाची मदत घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबई हल्ला धमकी प्रकरणः सात क्रमांकांपैकी एक क्रमांक यूपी एटीएस अधिकाऱ्याचा)
पोलिसांकडून चौकशी
या धमकीच्या प्रकरणानंतर गुन्हे शाखेने तत्काळ तपास सुरू केला असून, या प्रकरणात वसई येथून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मद आसिफ असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मोहम्मद आसिफ हा वसई येथे सलून चालवतो व त्याचा संबंध या मेसेजशी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून मोहम्मद आसिफ याच्याकडे चौकशी सुरू आहे.
Join Our WhatsApp Community