कोरोनाच्या संकटानंतर राज्यात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला. हिंदू हे उत्सवप्रिय आहेत, कोरोना काळात हिंदुंनी संयम पाळला. आपल्यामुळे कोरोना पसरणार नाही, याची बहुसंख्य जनतेने काळजी घेतली. आता गणेशोत्सव देखील थाटात साजरा होणार आहे.
ठाकरे कुटुंबाला गौड गैरसमज
मालाडच्या एका दहीहंडी पथकाने तीन थर रचून त्यावर अफझल खान वधाचा देखावा सादर केला. यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी निष्ठा दहीहंडीचं आयोजन केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईकरांच्या मनात ही निष्ठा शिवसेनेप्रति असायला हवी, म्हणजेच ठाकरेंविषयी. एकंदर ठाकरे कुटुंबाला एक गोड गैरसमज झालेला आहे की, मुंबई त्यांच्या मालकीची आहे.
आमदार नोकर आहेत का?
मुंबईकरांनी ठाकरेंविषयी निष्ठा बाळगायला मुंबईकर काय ठाकरेंचे नोकर आहेत काय? मुंबईतला मराठी माणूस स्वतः कष्ट करतो आणि कमावतो. एकनाथ शिंदे किंवा इतर बंडखोर आमदारांविषयी बोलताना देखील ठाकरे कुटुंबाची एकच भाषा असते की आम्ही त्यांना हे दिलं, त्यांनी गद्दारी केली, त्यांनी निष्ठा दाखवली नाही. याचा अर्थ हे सगळे आमदार ठाकरेंचे नोकर आहेत काय?
मालक आणि नोकर मुद्दा कुठे?
कोणताही पक्ष असला की पक्ष एका होतकरु, कर्तृत्ववान माणसाची निवड करतो, आमदारकी वगैरे देतो आणि ते नेतेसुद्धा आपला पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कष्ट घेतात. उद्या नरेंद्र मोदींनी म्हटलं की मी देवेंद्र फडणवीसांना घडवलं, मी त्यांना मुख्यमंत्री केलं, म्हणून त्यांनी माझ्याप्रति निष्ठा दाखवली पाहिजे तर चालणार आहे का? देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांना नरेंद्र मोदींनी संधी दिली कारण ते त्यासाठी योग्य होते. यात मालक आणि नोकर असा मुद्दा आला कुठे? कुटुंबवादी पक्षाची हीच समस्या असते. एका विशिष्ट कुटुंबाला असं वाटू लागतं की आपण सर्वांचे मालक आहोत आणि बाकीचे आपले नोकर आहेत.
मुंबईकरांची निष्ठा ठाकरेंवर की विकासावर?
वरुण सरदेसाई यांनी निष्ठा दहीहंडीचं आयोजन करण्यामागे हीच मानसिकता आहे. या सर्वांना अजूनही असं वाटतं की मुंबईकर यांचे नोकर आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईकरांनी स्वीकारलं होतं. मुंबईकरांनी त्यांच्या कौटुंबिक वारसदारांना स्वीकारलेलं नाही, हे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत कळलेलं आहे. आता मुंबईकरांची निष्ठा ठाकरेंवर आहे की विकासावर आहे, हे निवडणुकीत सिद्ध होईल.
गर्व की बालबुद्धी?
पण या निष्ठा दहीहंडीचं आयोजन करुन वरुण सरदेसाई यांनी हे सिद्ध केलं आहे की ठाकरे प्रचंड घाबरलेले आहेत. मुंबई पालिकेवरची आपली सत्ता आपण गमावणार आहोत ही भिती त्यांच्या मनात आहे. त्यात लोकांची कामे करुन लोकांचं मन जिंकायचं, याऐवजी वरुण यांना निष्ठा दहीहंडीचं आयोजन करावसं वाटतं. ह्याला गर्व म्हणायचे की बालबुद्धी?
Join Our WhatsApp Community