दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर जे.जे. रुग्णालयात दाखल

171

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला प्रकृती खालावल्यामुळे जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इक्बाल कासकरला शनिवारी दुपारनंतर अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तळोजा तुरुंगातून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबधित त्रासामुळे इक्बालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जे.जे. रुग्णालयात दाखल 

इक्बाल कासकर याच्याविरोधात फारसे गंभीर गुन्हे नसल्याने तो पाकिस्तानमधून भारतात परतला होता. मात्र, त्याने दाऊदची धमकी देत खंडणी वसूली सुरू केली होती. त्याला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये खंडणी प्रकरणी अटक केली होती. कासकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून तळोजा कारागृहात आहे.

ईडीकडून चौकशी सुरू 

अलिकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एनआयएने यूएपीएच्या कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इक्बाल कासकर यांच्यासह सात जणांचा यात समावेश आहे. हे लोक भारतात दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेले असून त्यांचे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा दावा एनआयएने केला आहे. दरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईक यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले. ईडी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.