१९४६च्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभेने सपाटून मार खाल्ला. सोळा टक्के मतदान त्यांच्या बाजूने झाले असले तरी एकाही प्रांतात एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे ब्रिटिश सत्तेने केवळ काँग्रेस आणि मुस्लीम लीग या दोन पक्षांनाच सत्तांतराच्या आणि देशाच्या संभाव्य वाटणीसाठी वाटाघाटींना बोलावले. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्या झाली. दोनच दिवसात हिंदू महासभेचे उपाध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी कोणाशीही सल्लामसलत न करता हिंदू महासभा राजकारण सोडते आहे अशी घोषणा केली.
( हेही वाचा : कोकणातील मेमू गाडी कायमस्वरूपी सुरू राहणार? करता येणार फक्त ९० रुपयात प्रवास)
स्वातंत्र्यानंतरही एक दबावगट म्हणून हिंदू महासभेची गरज आहे अशी सावरकरांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी ताबडतोब हिंदू महासभा राजकारण सोडणार नाही, पक्षाची सर्व कामे पूर्ववत चालू ठेवावीत असे जाहीर केले. काँग्रेस हा राष्ट्रीय व धर्मनिरपेक्ष पक्ष आहे परंतु तो छद्म धर्मनिरपेक्ष असल्यामुळे खऱ्या अर्थाने निष्पक्षपातीपणाने हिंदूंचे हित जपणारा पक्ष नाही म्हणून हिंदू महासभा हवीच अशी सावरकरांची भूमिका होती. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि संघ परिवार आणि सरसंघचालक गोळवलकर यांचा आग्रह असा होता की स्वतंत्र भारतात ‘हिंदू’ या शब्दाची राजकारणात तितकीशी गरज नाही. तेव्हा आपल्या पक्षाच्या नावात हिंदू शब्दाऐवजी ‘भारतीय’ हा शब्द असायला हवा. याच वादातून हिंदू महासभेमध्ये फूट पडली. त्यातच नेहरूंनी हिंदू महासभा नष्ट करायची असा चंग बांधला. वेगवेगळ्या प्रकारे हिंदू नेते आणि हिंदू कार्यकर्त्यांचा छळ चालू होता. केवळ अहिंसेने स्वराज्य मिळाले असा प्रचार चालू होता. हिंदू महासभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर, भाई परमानंद, आशुतोष लाहिरी यांच्यासारख्या अंदमानात शिक्षा भोगलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांना सन्मान नव्हता. सध्या सुद्धा केवळ सावरकरांवर चिखलफेक करता यावी म्हणून भगतसिंग यांच्या नावाचा वापर केला जातो. अन्यथा इतक्या वर्षात भगतसिंग यांनासुद्धा भारतरत्न देण्यात आलेला नाही हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
अशाप्रकारे हिंदू महासभा नष्ट करण्याच्या नेहरूंच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ४ एप्रिल १९५० या दिवशी सावरकर आणि अन्य महत्त्वाचे १७-१८ हिंदू महासभा नेते नेहरू सरकारने विनाचौकशी अटकेत टाकले. कारण ५ एप्रिल १९५० ला पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारताला भेट देणार होते. पण नेहरू सरकारकडून खोटाच प्रचार केला गेला की हिंदू महासभेकडून नेहरूंच्या खूनाचा कट रचला जात आहे. या आरोपाला काहीच अर्थ नव्हता, कसलाच पुरावा नव्हता. काहीतरी कारण चिकटवायचे म्हणून तो आरोप केला गेला प्रत्यक्षात नेहरूंना हिंदुत्ववादी विरोधी पक्ष नष्टच करायचा होता. हिंदू शब्दाच्या अभिमानी हिंदू महासभेपेक्षा भारतीय शब्द घेणारा जनसंघ ते सहन करू शकत होते. क्रमाक्रमाने हिंदू महासभा खच्ची होत गेली. श्यामाप्रसाद मुखर्जींवर काँग्रेसचा मोठा आर्थिक दबाव होता असे म्हटले जाते. ते मंत्रीमंडळात सुद्धा होते. पडद्यामागे काय काय घडले ते जे काय असेल ते असो, परंतु त्यानंतर गोळवलकर गुरुजी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मिळून ‘भारतीय जनसंघ’ असा हिंदू शब्द वगळलेला नवा राजकीय पक्ष काढला.
स्वतंत्र भारतात निवडणुका जिंकण्यासाठी मुस्लिमांची मते सुद्धा मिळणे आवश्यक आहे असे या सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणाऱ्यांचे म्हणणे होते. अजून जास्त योग्य प्रकारे सांगायचे तर सावरकरांच्या हिंदुत्वात संघ परिवाराला द्विराष्ट्रवादाचीच बीजे दिसत असावीत. डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, मोहम्मद अली जिना हे सर्वजण एक प्रकारे द्विराष्ट्रवादी होते. पण केवळ सावरकरांच्याच १९३८च्या भाषणावर टीका होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर सुद्धा द्विराष्ट्रवादी होते हे सोयीस्करपणे बाजूला टाकले जाते, असो. द्विराष्ट्रवाद हा या लेखाचा विषय नाही. मात्र हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एकच आहे हे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वाक्य आले तो त्याच विचारसरणीचा भाग आहे. डीएनए एक आहे याला आक्षेप कोणाचा असू शकत नाही. ते खरेच आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान येथील जवळपास ९० टक्के मुसलमान हे मूळचे हिंदूच होते, त्यांचे पूर्वज हिंदूच होते. परंतु या वंश किंवा रक्तबंधनापेक्षा, धर्मबंधन मुस्लिम मानसिकता अधिक महत्त्वाचे मानते ही खरी समस्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा ते माहित आहे, परंतु भारतीय राज्यघटनेशी सुसंगत राहण्यासाठी अशाप्रकारे कोठेही सूक्ष्म प्रकारे सुद्धा ध्वनित होणारा द्विराष्ट्रवाद त्यांना नको होता.
सावरकरांनी १९४३ सालापासूनच हिंदू महासभेचे अध्यक्षपद सोडून दिले होते आणि १९५२ पर्यंत राजकारणातून पूर्ण निवृत्त झाले होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष असलेले सावरकरांनंतर जवळपास क्रमांक दोनचे नेते राहिलेले श्यामाप्रसाद मुखर्जीच सभा सोडून नवा पक्ष काढतात म्हटल्यावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी मोठी संघटना तिच्या पाठीशी जाते असे पाहिल्यावर हिंदू महासभेतून अनेक लोक पक्षांतर करू लागले. काही काँग्रेसमध्ये गेले तर काही जनसंघात जाऊ लागले. बरेच जण अर्थातच सावरकरांकडे येऊन पक्ष सोडण्यासंबंधी माहिती देऊ लागले किंवा सौजन्य म्हणून पूर्वपरवानगी म्हणा, घेऊ लागले. नेहरूंच्या जबरदस्त आर्थिक, राजकीय ताकदीपुढे आणि अफाट लोकप्रियते पुढे सावरकरांचा निभाव लागणे शक्य नव्हते.
वाटल्यास काँग्रेसमध्ये जा जनसंघात जाऊ नका
याचवेळी हिंदुमहासभेचे एक महत्त्वाचे नेते वि. घ. देशपांडे यांच्याही मनात हिंदू महासभा सोडण्याचा विचार घोळू लागला. देशपांडे हिंदू महासभेकडून खासदार म्हणून निवडून आले होते. (गुणा किंवा ग्वाल्हेर मतदारसंघ) सावरकर सदनमध्ये येऊन त्यांनी सावरकरांची हिंदू महासभा सोडण्यासंबंधी परवानगी घेतली. असे म्हटले जाते की यावेळी सावरकर म्हणाले की, ‘तुम्हाला हिंदू महासभा सोडून जायचं असेल तर जा, परंतु काँग्रेसमध्ये जा जनसंघात जाऊ नका. कारण जनसंघाची एक तर हिंदू महासभा होईल किंवा दुसरी काँग्रेस होईल.’ सावरकरांच्या या सल्ल्यामागची तत्कालीन राजकीय परिस्थिती लक्षात न घेता, बरेच जण ही घटना, जनसंघावर आणि सध्याच्या भाजपावर टीका करण्यासाठी उपयोगात आणतात. टीका करणाऱ्यांचा हिंदुत्वाशी संबंध असतोच असे नाही आणि इतर बहुतेकांचे तर फक्त नक्राश्रू असतात. ते जनसंघाचे नसतात, हिंदू महासभेचे ही नसतात आणि सावरकरवादी तर मुळीच नसतात.
वस्तुतः सावरकरांचा हा सल्ला अगदी साधा व्यावहारिक, सत्ता आणि हिंदुत्व या दोन घटकांपुरताच मर्यादित होता. भ्रष्टाचार किंवा अन्य राजकीय कारणांमुळे अथवा आर्थिक धोरणांच्या मतभेदांमुळे नव्हता. सावरकरांना अशी भीती वाटत होती की जनसंघ सुद्धा हिंदू शब्द सोडत असल्यामुळे आणि मुसलमान मते निवडणुका जिंकण्यासाठी हवीशी झाल्यामुळे मुस्लिम मतांसाठी काँग्रेसप्रमाणेच मुस्लीम तुष्टीकरण सुरू करेल. केवळ हिंदूंच्या वतीने बोलणारा, त्यांचे हीत जपणारा स्वतंत्र राजकीय पक्ष असलाच पाहिजे हा त्यांचा पंधरा वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी मत मांडले भारतीय जनसंघ सुद्धा एक तर दुसरी हिंदू महासभा आज होईल किंवा दुसरी काँग्रेस तरी होईल. जर जनसंघ दुसरी हिंदू महासभा होणार असेल तर सध्या अस्तित्वात असलेली हिंदू महासभा सोडून देण्यात काहीच अर्थ नाही मग त्यापेक्षा काँग्रेसमध्ये गेला तर सत्ता तरी मिळेल. एक तर सत्तेची आकांक्षा न ठेवता किंवा जेव्हा ते मिळेल तेव्हा मिळेल अशा धोरणाने हिंदू महासभेत एक दबावगट म्हणून काम करत राहा किंवा सरळ काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता संपादन करून जितके होईल तितके हिंदू हीत साध्य करा. अर्थात ते हीत साध्य करता येईल याची खात्री नव्हतीच. पण या व्यावहारिक कारणाव्यतिरिक्त जनसंघात जाऊ नका असे सांगण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते. सावरकरांची ही भीती वाजपेयींच्या गांधीवादी समाजवाद वगैरे धोरणांपर्यंत दिसून येत होती. त्या दृष्टीने सावरकरांचा इशारा खराच ठरला. ना धड सत्ता ना धड हिंदुत्व अशी जनसंघाची स्थिती राहिली. १९८३ या सावरकर जन्मशताब्दी पासून मात्र क्रमाक्रमाने यात बदल होऊ लागला. १९८४- ८५ सालात गंगाजल यात्रा, नंतर रामजन्मभूमी इत्यादी.
आज सावरकरांचा हा सल्ला लागू आहे का?
आजच्या भाजपामध्ये जाण्यापेक्षा काँग्रेसमध्ये जा असे सावरकरांनी सांगितलेच नसते हे उघड आहे. कारण काँग्रेस किंवा डावे पक्ष किंवा बहुतांशी सर्व स्थानिक पक्ष हे हिंदुत्वाला अजूनही पूरक नाहीत. या सर्वांना मुस्लिम अथवा काही भागात प्रभावी असणाऱ्या ख्रिश्चनांसारख्या अल्पसंख्यांकांच्या मतांची काळजी आहे. असे असले तरी पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भाजपा हा मात्र हळूहळू अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचे धार्मिक राजकारण कमी करत आहे. यातील दोन महत्त्वाची राज्ये म्हणजे गुजरात आणि त्यापेक्षाही उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही आणि तरीही प्रचंड बहुमताने निवडून आले. रामजन्मभूमी आंदोलन, काशी विश्वनाथ, ३७० कलम असे करत करत आता समान नागरी संहितेकडे भाजपाची वाटचाल सुरू आहे.
देशाचे परराष्ट्रीय संबंध सुद्धा नेहरू किंवा शास्त्री यांच्या काळासारखे स्वप्नाळू आणि भाबडे राहिलेले नाहीत. ठामपणे राष्ट्रहित प्रथम लक्षात घेत आणि अग्निपथच्या माध्यमातून भारतीय तरुणाईच्या सैनिकीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. उत्तमोत्तम आधुनिक शस्त्रास्त्रे, वैज्ञानिक प्रगती याकडे देश जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि हिंदू महासभेचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्यानंतर सावरकरांनी भाजपमध्ये जाऊ नका, तिची दुसरी काँग्रेस होईल असे ‘आज’ सांगितले नसते. कारण भाजपाकडे आज सत्ताही आहे, जी पूर्वी जनसंघाकडे नव्हती आणि सावरकर यांच्या कल्पनेतील हिंदुत्वाकडे सुद्धा, जरी १००% नसले तरी, योग्य दिशेने भाजपाची वाटचाल सुरू आहे. आर्थिक धोरणांच्या बाबतीत सावरकर समाजवादी विचारांचे किंवा साम्यवादी विचारांचे होते, मात्र त्यांनी वर्गविग्रहापेक्षा ‘वर्ग हीतांचा राष्ट्रीय समन्वय’ हे आर्थिक धोरण स्वीकारले. तो भारताच्या कल्याणकारी शासन धोरणाशीच सुसंगत आहे. अन्य कोणत्याही भारतीय राजकारण्याला किंवा विचारधारेला ‘वर्ग हितांचा राष्ट्रीय समन्वय’ या सावरकरी धोरणापलीकडे जाता आलेले नाही. तो एक वेगळाच विषय आहे, पण जनसंघ/ भाजपमध्ये जायचे की नाही याच्याशी त्यावेळेच्या सल्याचा आर्थिक धोरणांच्या संदर्भात काही संबंध नाही असा मुद्दा सांगायचा आहे.
थोडक्यात ‘वाटल्यास काँग्रेसमध्ये जा पण जनसंघात (आता भाजपात) जाऊ नका’ हे सावरकरांचे वाक्य आज कालसुसंगत राहिलेले नाही. ते फक्त त्या काळापुरते लागू होते, आज संदर्भहीन झालेले आहे.
Join Our WhatsApp Community