शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत जाऊन अर्जुन खोतकर यांना भेटल्यावर खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. आता रविवारी, २१ ऑगस्ट रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
अशोक चव्हाण माझे गुरू
राज्यात सत्तासंघर्षानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नांदेड दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सत्तार आणि चव्हाण यांच्यात अर्धा तास बंद दारात चर्चा झाली. बाहेर येताना दोघांनीही सगळे ओक्के ओक्के असल्याचे सत्तार म्हणाले. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशोक चव्हाण, स्वर्गिय श्रीकांत चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम केले आहे. आजही त्यांचे मराठवाडा, महाराष्ट्र, शेतकऱ्यांबाबतीत जाण आहे. त्यांचा अभ्यास चांगला आहे. अशोक चव्हाण माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)
आमची मैत्री खूप जुनी
अब्दुल सत्तार हे कुठेही असले तरी आमचे मैत्रीचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय पक्ष वेगळे असले तरी आमची मैत्री खूप जुनी आहे. कुठल्याही पक्षात असले तरी मैत्रीचे संबंध हे कायम असतात. आज माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे. त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे, ते निश्चित चांगले काम करतील. पहिल्यापासून माझी भूमिका आहे की, राजकारणात मतभेद असावेत पण वैयक्तिक मतभेद नसावेत अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community