वीर सावरकर हिंदुत्वनिष्ठ होते. पण केवळ हिंदुत्वनिष्ठेमुळे त्यांचे अल्पसंख्याकांविषयी बरे किंवा वाईट मत झाले होते, असे म्हणता येणार नाही. कारण सावरकर हे प्रॅक्टिकल होते. खरं पाहता, हा देश हिंदूंचा आहे. इथे अनंत काळापासून हिंदू जाती अभिमानाने जगत आहेत. बाहेरुन आलेल्या आक्रमकांच्या विरोधात हिंदुंनी प्रतिकार केलेला आहे. इंग्रजांच्या विरोधातसुद्धा कुणी दिला नसेल असा लढा हिंदुंनी उभारला आहे. त्यामुळे हे हिंदुराष्ट्र आहे अशी सावरकरांची धारणा असेल तर यात चूक काहीच नव्हते.
वीर सावरकरांबद्दल असा आरोप केला जातो की १८५७चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथात त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्या इंग्रजांविरुद्धच्या संयुक्त लढ्याबद्दल लिहिले आहे. परंतु नंतर मात्र ते मुस्लिमांच्या विरोधात गेले. ज्यावेळी हा ग्रंथ त्यांनी लिहिला तेव्हा ते विशीतले तरुण होते. सर्वांचं संघटन करुन इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचा हा मुख्य उद्देश त्यांच्यासमोर होता. नंतर मात्र मुस्लिम प्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला. महात्मा गांधीजींच्या राजकीय उदयानंतर हा प्रश्न अधिक जटिल झाला.
सावरकरांच्या मनात पारशी समाजाविषयी विशेष आदर होता. कारण त्यांनी कधी धर्मांतरे केली नाहीत आणि हिंदू जातीला त्रास होईल असे कधी वागले नाहीत. उलट हिंदू समाजासोबत मिळून त्यांनी कामे केलेली आहेत. त्यांच्या मनात आपल्या समाजाबद्दल कडवटपणा असला तरी तो मनातच आहे, जनात नाही. ज्यू किंवा ऍंग्लो इंडियन समाजाविषयी देखील त्यांची मते बरी होती. ख्रिस्ती समाज देखील मुस्लिमांच्या तुलनेने खूपच कमी आक्रमक आहे. त्यांना भारताचे तुकडे पाडून ख्रिस्तीस्थान होऊ द्यायचा नव्हता. असा धोका वाटल्यावर त्यांनी हिंदुंना सावध केलेले आहे. सावरकर लिहितात, ‘आमचे पारशी नि ख्रिश्चन देशबंधू हे आजच आमच्याशी सांस्कृतिकदृष्ट्या समानशील आहेत. इतके देशभक्त आहेत आणि ऍंग्लो इंडियन इतके समंजस आहेत की, ते हिंदूंच्या न्याय्य भूमिकेवर येण्याचे मुळीच नाकारणार नाहीत.’ हे राष्ट्र हिंदूंचं आहे. तरी इथे कोणत्याच समाजाविषयी भेदभाव केला जाणार नाही. परंतु तुम्ही हिंदुंच्या आणि हिंदुराष्ट्राच्या मूळावर उठला असाल तर मात्र सावरकरांचा या गोष्टीला विरोध होता. मुस्लिम समाज त्यामाने स्वातंत्र्यलढ्यात फारसा सहभागी झाला नाही. खिलापत चळवळीत या समाजाने जणू उपकार म्हणून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्याचे गंभीर परिणाम हिंदुंना भोगावे लागले. सावरकरांनी पाकिस्तानचा धोका ओळखला होता. परंतु तत्कालीन नेते हिंदू समाजासोबत बेडकाचा खेळ खेळण्यात गुंतले होते. परीणामस्वरुप देशाची फाळणी झाली. एवढेच नव्हे हिंदुंचे नुकसान झाले. कत्तली झाल्या, आया-बहिणीची अब्रू लुटली गेली. हे भविष्य सावरकरांना दिसत होते म्हणून त्यांनी अनेकदा हिंदुंना सावध केले होते.ऐक्यासाठी केवळ हिंदुंनीच त्याग करावा या गोष्टीला सावरकरांचा विरोध होता. हिंदी राष्ट्र निर्माण करायचे आहे ते सर्वांच्या साथीने, केवळ हिंदुंच्या त्यागावर नव्हे. परंतु तत्कालीन नेत्यांनी हिंदुंच्या त्यागावर हिंदी राष्ट्राचा प्रयोग केला आणि तो प्रयोग फसला. पाकिस्तानची निर्मिती झाली, या निर्मितीनंतर देखील कित्येक वर्षे पाकिस्तानची मानसिकता बदलली नव्हती. पाकिस्तानला केवळ बळाचीच भाषा कळते हे कॉंग्रेसी लोकांना पटत नव्हते. म्हणून पाकिस्तानने आपल्यावर अनेक आक्रमणे केली. मुस्लिमांविषयी भाष्य करताना सावरकरांनी सत्य तेच कथन केले, त्यामुळे त्यांना मुस्लिम विरोधी ठरवण्यात आले. पण सावरकर हे मुस्लिम विरोधी मुळीच नव्हते तर ते हिंदुत्वनिष्ठ होते म्हणजे मानवतावदी होते.
Join Our WhatsApp Community