थोर इतिहासकार आणि साहित्यिक विष्णू श्रीधर जोशी अर्थात वि. श्री. जोशी यांची २० ऑगस्ट २०२२ रोजी १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिकारकांचे चरित्रकार ही त्यांची विशेष ओळख आहे. भारतीय क्रांतिकारकांचा ज्वलंत इतिहास सांगणारी जवळपास १४ पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. १८५७च्या युद्धापासून क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांचे चरित्र त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जिवंत केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणास्थान असलेल्या चापेकर बंधूंचे चरित्र त्यांनी कंठस्नान आणि बलिदान या पुस्तकातून रेखाटले आहे. सर्वच सशस्त्र क्रांतिकारकांचा सखोल अभ्यास करुन त्यांनी चरित्रे लिहिली आहेत.
( हेही वाचा : कोकणातील मेमू गाडी कायमस्वरूपी सुरू राहणार? करता येणार फक्त ९० रुपयात प्रवास)
अलिकडचे इतिहासकार किंवा साहित्यिक हे क्रांतिकारकांबाबत बऱ्याचदा काल्पनिक माहिती देतात. सिनेमा किंवा इतर ठिकाणची माहिती गोळा करुन ते आपल्यासमोर मांडत असतात. पण जे काही ऐतिहासिक साहित्य उपलब्ध आहे ते शोधून त्यातला खरा इतिहास मांडायचा विचार देखील कोणी करत नाही. हे दुर्दैव आहे. वि. श्री. जोशींनी जे काही ऐतिहासिक ग्रंथ लिहिले आहेत ते सखोल संशोधन करुन लिहिण्यात आले आहेत.
त्यांच्याइतकं संशोधन खूप कमी इतिहासकारांनी केले आहे. प्रत्यक्ष सरकारी दस्ताऐवजांमध्ये क्रांतिकारकांबाबत उपलब्ध असलेली माहिती, क्रांतिकारकांचे वंशज आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी संपूर्ण माहिती संकलित केली आणि ती आपल्या ग्रंथांमधून मांडली. त्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक साहित्यात आपल्याला काल्पनिक किंवा नाट्यमय गोष्टी अजिबात पहायला मिळणार नाहीत. सबंध देशभरातील क्रांतिकारकांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटना त्यांनी जशाच्या तशा मांडल्या आहेत. त्यामुळे विश्वासार्ह आणि खरा इतिहास जाणून घेण्यासाठी वि. श्री. जोशींची पुस्तके वाचणे अत्यंत गरजेचे आहे.
एकदा झाशीच्या राणीच्या चरित्रावर आधारित एका कीर्तनात कीर्तनकारांनी एका नाटकातील प्रसंग सांगायला सुरुवात केली. त्यावेळी खुदाबक्षला गोळी लागल्यानंतर झाशीच्या राणीने खुदाबक्षसाठी गयावया करायला सुरुवात केल्याचे कीर्तनकारांनी सांगितले. हे सगळं चुकीचं आहे. चापेकर बंधूंच्या बाबतही एका कीर्तनकाराने अशाच प्रकारे ऐकीव माहितीवर कीर्तन केले. तिन्ही चापेकर बंधूंनी देशासाठी त्याग केला आहे. पण तरी त्यांच्याबाबत चुकीची माहिती दिली जाते. त्यामुळे क्रांतिकारकांचा जो उपलब्ध असलेला इतिहास आहे त्याचा नीट अभ्यास करुन माहिती देणं गरजेचं आहे. कारण अर्धवट किंवा चुकीची माहिती देणं हा एकप्रकारे क्रांतिकारकांचा अपमान आहे. क्रांतिकारकांचा इतिहास सांगण्यासाठी कोणत्याही काल्पनिक किंवा नाट्यमय घटनांची पेरणी करायची गरज नाही. त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या घटनाच इतक्या रोमहर्षक आहेत की त्या वाचल्यानंतर आपल्या अंगात वीरश्री संचारते. त्यामुळे वि. श्री. जोशींसारख्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला इतिहास शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील सांगणं गरजेचं आहे.