राज्यात दुर्मिळतेने सापडणा-या स्टार टर्टल प्रजातीच्या जखमी कासवाची विनापरवाना पनवेलहून पुण्यात वाहतूक करुन गुपचूपपणे उपचारासाठी सुपूर्द करण्याचा प्रकार तरुण महिला छायाचित्रकाराच्या अंगलट आला आहे. पनवेलमध्ये राहणा-या या महिला वन्यजीव छायाचित्रकाराची आता वनविभागाकडून चौकशी सुरु असून, तिच्यावर वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्हा समजला जातो
महाराष्ट्रात स्टार टर्टल या कासवाची प्रजाती सहसा आढळत नाही. तेलंगण आणि दक्षिणेतील इतर राज्यांत दिसून येणा-या या प्रजातीची संख्या राज्यात केवळ अवैध तस्करीच्या माध्यमातून वाढत आहे. या कासवांचा महाराष्ट्रात नैसर्गिक अधिवास नाही. त्यामुळे स्टार टर्टल प्रजातीची विक्री, खरेदी तसेच स्वतःजवळ बाळगणे हा वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा समजला जातो. वनविभागाने राज्यातील विविध भागांत धाडी टाकून स्टार टर्टल प्रजातींच्या कासवांची अवैध विक्री प्रकरण उघडकीस आणले आहे. २३ जुलै रोजी पुण्यातील ‘रेस्क्यू’ या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे संबंधित महिला वन्यजीव छायाचित्रकार स्टार टर्टल प्रजातीचे कासव उपचारांसाठी घेऊन आली. रेस्क्यू संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासव सापडल्याच्या नेमक्या ठिकाणाची माहिती संबंधित महिलेने देण्यास नकार दिला. कासव कायद्यानुसार संरक्षित असल्याने याबाबतची कायदेशीर माहिती संस्थेच्या डेटामध्ये तपशीलवार देण्यासाठी गरजेचे असल्याचे पंचमिया यांनी संबंधित महिलेला सांगितले. माझ्या मित्राकडून मी कासव हस्तगत करुन उपचारांसाठी आणला आहे. मित्राला अडचणीत मला आणायचे नाही परंतु त्याच्याकडे अजूनही स्टार टर्टल प्रजातीचे कासव असल्याचे तिने पंचमिया यांना सांगितले. पंचमिया यांनी याबाबतची माहिती वनविभागाला देण्याचा सल्ला महिलेला दिला. वनविभागाला आपल्या डेटातील माहितीतून या घटनेची माहिती मिळाली. डेटातील माहितीत पनवेलहून स्टार टर्टल प्रजातीचे कासव सापडल्याची वनविभागाकडे नोंद नव्हती. प्रत्यक्षात महिलेने वनविभागाला स्टार टर्टल पनवेलहून उपचारांसाठी दाखल केल्याची माहिती दिलीच नसल्याचे मलाच वनविभागाकडून समजले, असे पंचमिया यांनी सांगितले.
(हेही वाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग का बनलाय मृत्यूचा सापळा?)
वनविभागाने चौकशी सुरु केली
वनविभागाच्या नोंदीत स्टार टर्टल पनवेलमधून सापडल्याची माहिती संबंधित वन्यजीव छायाचित्रकाराने न दिल्याने आता चौकशी सुरु झाली आहे. १३ ऑगस्ट रोजी पनवेल वनविभागाच्या कार्यालयात संबंधित महिला वन्यजीव छायाचित्रकाराची चौकशी सुरु झाली. स्टार टर्टल प्रजातीचे कासव कोणाकडून आणि कुठून हस्तगत केले, कोणाच्या परवानगीने कासवाला पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारासाठी सुपूर्द केले, याची चौकशी वनविभागाने सुरु केली आहे. २३ जुलै रोजी कासव हस्तगत करताना संबंधित महिलेने कासवाचे संस्थेतील उपचारांबाबतचे शूटींगही केले. त्याबाबतची रितसर परवागी घेतल्याची माहिती नेहा पंचमिया यांनी दिली. सदर महिला वन्यजीव छायाचित्रकार जून महिन्यातच वनविभागाची रितसर परवानगी घेऊन स्टार टर्टल प्रजातीचे कासवाचे शूटिंग करण्यासाठी आली होती, अशी माहिती नेहा पंचमिया यांनी दिली. त्यानंतर दुस-या भेटीत जखमी स्टार टर्टल प्रजातीचे कासव घेऊन आल्यानंतरच महिला वन्यजीव छायाचित्रकाराने शूटींग केले. वनविभागाने दुस-या घटनेतील व्हिडिओ शूटींगबाबत चौकशी करण्यासाठी महिलेला २२ ऑगस्ट रोजी पनवेल कार्यालयात बोलावले आहे. या महिलेला संपर्क केला असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याबाबत फारशी माहिती देता येणार नाही, असे सहाय्यक वन्यजीव रक्षक तसेच सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक आणि वन्यजीव), पनवेल वनविभाग म्हणाले.
गुन्हा काय?
स्टार टर्टल प्रजातीचे कासव वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार, चौथ्या वर्गवारीत संवर्धित आहे. कासवाची अवैधरित्या विक्री, खरेदी तसेच बाळगल्याप्रकरणी किमान २५ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
Join Our WhatsApp Community