शिंदे-फडणवीस सरकारने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी सर्व निर्बंध हटवले आहेत. उत्सव बिनधास्त साजरा करा असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही त्यानुसार नियमावली बनवली आहे. त्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र मंडप ३० फुटाच्या वर नसावा असे महापालिकेने म्हटले आहे.
काय आहे नियमावली?
दोन वर्षे कोरोनाच्या काळात सर्व सण-उत्सव शांततेत गेल्यानंतर कालच दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला, आता ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवदेखील सुरू होणार आहे. ३१ ऑगस्टला बाप्पाच्या आगमनाची वाट सारेच भाविक पाहत आहेत. अशात निर्बंध नसले तरी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून काही नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार गणेश मंडळांना सर्व नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंडप उभारताना तो मंडप ३० फुटांपर्यंत असावा. त्यापेक्षा मोठा नसावा. २५ फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असणार आहे. मंडप परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला प्रति खड्डा २,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मंडपामध्ये कोणताही स्टॉल उभारता येणार नाही. पीओपीच्या गणेशमुर्तींवर उंचीच्या मर्यादेचे बंधन नसेल, प्रतिबंधीत जाहिराती मंडपात लावल्यास कारवाई होईल, साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता स्वच्छतेची जबाबदारी गणेश मंडळांची असेल, स्पीकर, डीजेच्या आवाजाची डेसीबल मर्यादा पाळणे बंधनकारक असेल, असे नियमावलीत म्हटले आहे.
(हेही वाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग का बनलाय मृत्यूचा सापळा?)
Join Our WhatsApp Community