मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साकारली भंगारातून इंजिनवरील मिनी ट्रेन व रोबोट

182
मुंबई महापालिका ही भंगारातून लाखो रुपये महसूल गोळा करत असल्याची चर्चा आपण ऐकली आहे. परंतु समुद्रातून माणिक, मोती, हिरे शोधावे तसे भंगारातून भंगारसामान शोधून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनालाही थक्क करायला केले आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली ही कामगिरी पाहून रेल्वे प्रशासनच नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही तोंडात बोट घालायला लावले आहे. महापालिकेच्या कामगारांनी चक्क मिनी ट्रेन बनवली आहे. अगदी हुबेहुब इंजिनवर चालणारी ही ट्रेन पाहून रेल्वे प्रशासनातील अभियंत्यांनाही आश्चर्य वाटेल. केवळ या ट्रेनची निर्मिती केली  नसून भंगारातील लोखंडी सामान शोधून रोबोटही बनवला आहे. महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने ही किमया साधली असून लवकरच महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांनी बनवलेली ट्रेन राणीबागेतील पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाच्या कार्यशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेला रोबोट हा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या रोबोटची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, ही वेगवेगळ्या लोखंडी भंगार सामानांमधील विविध तुकडे शोधून त्यातून रोबोटची निर्मिती झाल्याची माहिती मिळत आहे. हा रोबोट ज्या लोखंडी भंगार सामानातून महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साकारला, त्याच टाकावू भंगार सामानातून इंजिनवर चालणारी मिनी ट्रेनच्या प्रतिकृतीची निर्मिती केली. महापालिकेतील यांत्रिकी व विद्युत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये वैविध्यपूर्ण अशी कला असून या माध्यमातून त्यांनी आपली कलाकारी दाखवून दिली आहे.
या रोबोट आणि मिनी ट्रेनची निर्मिती यांत्रिकी व विद्युत विभागातील बॉयलर मेकर असलेल्या लक्ष्मीकांत महाडिक या कारागिराने सहाय्यक अभियंता मिलिंद वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली इतर सहकारी कामगार व कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली. या दोन्हींच्या संकल्पनेबाबत बोलताना लक्ष्मीकांत महाडिक म्हणाले की यांत्रिकी व विद्युत विभागाच्या कार्यशाळेची जबाबदारी सहाय्यक अभियंता  मिलिंद वाणी यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी आपण कार्यालयातील दैनंदिन काम करताना काहीतरी वेगळेही करायला हवे, असा विचार मांडला. कार्यशाळेत त्यावेळी ओतशाळेसाठी लागणारे बरेच जुने भंगार सामान पडलेले होते, त्यातून काहीतरी वैविध्यपूर्ण कलाकृती करण्याचा विचार मिलिंद वाणी यांनी व्यक्त केला.
त्याच दरम्यान वाळकेश्वर येथील उद्यानात पाहणीसाठी गेले असताना, तेथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना तेथील उद्यानात मिनी ट्रेनची प्रतिकृती बनवण्याचे ठरले. या ट्रेनच्या निर्मितीबाबत बोलताना लक्ष्मीकांत महाडिक सांगतात की, उद्यान विभागासोबत झालेल्या चर्चेनुसार सहाय्यक अभियंता मिलिंद वाणी यांनी वाळकेश्वर येथील उद्यानात आपल्याला मिनी ट्रेनचे मॉडेल बनवून बसवायचे आहे अशी आम्हाला सूचना केली. त्यानुसार आम्ही कामाला लागलो. यासाठी लागणारे सामानही भंगारातून वेचून त्याप्रमाणे ट्रेनचे डबे, इंजिन तसेच रुळ आदींची आखणी केली आणि त्यानुसार आपले दैनंदिन काम करता करता थोडा वेळ काढून या कामाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात वाळकेश्वर येथील उद्यानाचे नूतनीकरण होणार असल्याने व त्यात बराच कालावधी जाणार असल्याचे कळल्यामुळे काम काही दिवस रखडले. परंतु मिलिंद वाणी, महाडिक व सहकारी यांनी एकदा हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि हळूहळू इंजिनवरील दोन डब्यांची मिनी ट्रेन साकारली गेली.
हे मिनी ट्रेनचे मॉडेल आता भायखळा येथील राणीबागेत बसवण्याचा विचार सुरु आहे. या ट्रेनच्या वापरात पूर्णपणे टाकावू/ भंगार वस्तूंचा वापर केला असून, त्यामध्ये पाण्याचे जुने पाईप, पट्ट्या तसेच इतर वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. मिनी ट्रेनचे काम करता करता भंगार सामानातून अजून काही तरी कलाकृती साकारावी असा विचार पुढे आल्यानंतर सहाय्यक अभियंता मिलिंद वाणी यांनी भंगारापासूनच रोबोट बनवण्याचा निर्णय घेतला व लक्ष्मीकांत महाडिक यांना तसे निर्देश दिलेत. त्यासाठी मग रोबोटची कागदावर प्रतिकृती तयार करून त्या आकाराचे भंगारातील सामानाच्या शोधकामाला सुरुवात झाली. त्यानुसार सामानांचे शोधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याला आकार देत त्याची जुळवाजुळवी झाली. यामध्ये रोबोटच्या हाताच्या बोटांचा आकार देण्याच्या कामावर विशेष मेहनत घेण्यात आली. या रोबोटच्या डोळ्यात बसवलेल्या लाल रंगाच्या एलईडी लाईट्सद्वारे रोबोटला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मिनी ट्रेन प्रमाणेच काही महिन्यांपूर्वी या रोबोटच्या कामाला सुरुवात केली गेली, परंतु दरम्यानच्या काळात कोविडमधील कामे व इतर दैनंदिन कामांमुळे हे काम मंदावले होते, परंतू मागील काही दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेच्या कार्यशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रोबोट बसवण्यात आला आहे.
महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्या मार्गदर्शनाखालील उपप्रमुख अभियंता (प्र.) अनिल जांभोरे, कार्यकारी अभियंता अमल मोहिते, सहाय्यक अभियंता मिलिंद वाणी, दुय्यम अभियंता कैलास शेळके, बॉयलर मेकर लक्ष्मीकांत महाडिक तसेच राजेश महाडिक, रवी नांदोसकर, किशोर आष्टीवकर, बाळू कचरे, विकास पाठारा, मोहन वाडेकर व अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या सहकार्य आणि मेहनतीमुळे मनपा कार्यशाळेच्यावतीने परिसरात पडलेल्या लोखंडी भंगार सामानातून मिनी ट्रेन आणि रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.