… तेव्हा वैभव चेंबरमधून फाईल्स हाताळल्या जायच्या; नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

114

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते, पण त्यांच्या खात्यात बाहेरील व्यक्तींचा सहभाग वाढला होता. जनतेतून निवडून न आलेली एक व्यक्ती वांद्रे येथील वैभव चेंबरमधून फाईल्स हाताळायची, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केला.

( हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साकारली भंगारातून इंजिनवरील मिनी ट्रेन व रोबोट)

नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकाला पाठिंबा दर्शविताना ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री म्हणून स्वतः एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक रद्द केले होते; मग अडीच वर्षांत त्यांची भूमिका बदलली कशी? की त्यांच्या हातून कोणी हे करवून घेत आहे, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर टीका करताना राणे म्हणाले, तत्कालीन सरकारमध्ये शिंदे मंत्री असले, तरी त्यांच्या खात्यात हस्तक्षेप अधिक होता. अशीच स्थिती इतर मंत्र्यांची होती. याला कंटाळून त्या सर्वांनी वेगळी वाट धरली, असे राणे यांनी सांगितले.

वरुण सरदेसाई ‘लक्ष्य’

वरुण सरदेसाई हे सरकारमध्ये नसताना, किंबहुना विधिमंडळ सदस्य नसताना नगरविकास खात्यात हस्तक्षेप करायचे. या विभागाच्या साप्ताहिक आढावा बैठका घ्यायचे. तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री या खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यायचे. वैभव चेंबर, मातोश्रीवरून फाईल्स हाताळल्या जायच्या, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.

राणे-वायकर यांच्यात खडाजंगी

राणे यांनी थेट वरुण सरदेसाई यांचे नाव घेतल्यामुळे उद्धव गटातील आमदार रवींद्र वायकर यांनी त्यास आक्षेप घेतला. विधिमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव अशाप्रकारे सभागृहात घेता येत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. परंतु, शरीर हलवत, वेगवेगळे हावभाव करीत तुमचा आमदार (भास्कर जाधव) कोणावरही बेछूट टीका करतो, ते चालते काय, असा प्रश्न राणे यांनी केला. शेवटी अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोघांमधील वाकयुद्ध थांबले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.