‘नवीन प्लेयरला ओपनिंगला उभं करुन बाऊन्सर टाकतायंत’, लोढांचे मिश्कील विधान

128

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या नव्या सरकारच्या काळातील विधीमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधक विरुद्ध सत्ताधारी यांच्याकडून तुफान फटकेबाजी होताना दिसत आहे. तसेच सदस्यांकडून हास्यविनोद देखील केले जात आहेत. राज्य सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासाला दिलेल्या भाषणात मिश्कील टिप्पणी करत हास्याची कारंजी उडवून दिली.

लोढांचे मिश्कील उत्तर

काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लोढा बोलत होते. ‘सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभं केलंय आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. त्यामुळे आता तरी थांबा’, असे मिश्कील उत्तर मंगलप्रभात लोढा यांनी दिले. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी वसंत मोरेंवर सोपवली मोठी जबाबदारी, 2024 लोकसभा निवडणुकीसाठी करणार काम)

रोजगारासाठी सरकारचे प्रयत्न

जनगणनेच्या कामाचा अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा लादण्यात येतो. त्याऐवजी या कामासाठी बेरोजगारांना शासन समाविष्ट करुन घेणार का?, यासाठी सरकार एखाद्या पॉलिसीचा विचार करणार आहे का?, असा प्रश्न भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला. त्यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले. दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पौर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.