गणेशोत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे केंद्रीय गुप्त वार्ता (आय.बी) अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी येथून समोर आली आहे. मारहाणीत गंभीररीत्या जखमी झालेल्या अधिकाऱ्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शांतीनगर पोलिसांनी ५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुखसागर रावत (३९) असे हल्ला झालेल्या आयबी अधिका-याचे नाव आहे. रावत हे केंद्रीय गुप्तवार्ता (आयबी)चे अधिकारी आहेत. भिवंडीतील गोपाळ नगर या ठिकाणी एका इमारतीत आयबीचे कार्यालय असून रावत हे त्या ठिकाणी असताना शनिवारी ५ अनोळखी व्यक्ती त्यांच्या कार्यालयात शिरल्या. त्यांनी साईश्रद्धा मित्र मंडळ, टेमघर येथून आलो असल्याचे सांगितले आणि रावत यांच्याकडे गणेशोत्सवाची वर्गणी म्हणून ५०१ रुपयांची मागणी केली.
कार्यालयात घुसून लाथाबुक्यांनी केली मारहाण
रावत यांनी हे सरकारी कार्यालय आहे तरी देखील त्यांनी स्वखुशीने ५१ रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. परंतु वर्गणी मागण्यासाठी आलेल्या इसमांनी ५०१ रुपये घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगत रावत यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रावत यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना मोबाईलवरून फोन लावला असता या पाच जणांच्या टोळीतील एकाने रावत यांचा मोबाईल खेचून घेत कार्यालयात घुसून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचा गळा आवळला रावत हे बेशुद्ध होताच या टोळीने तेथून पोबारा केला.
( हेही वाचा : मेटेंच्या अपघाती निधनानंतर सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, आता लक्ष्य आमदारांचे चालक )
कार्यालयात आलेल्या वरिष्ठ अधिका-यांनी रावत यांना तत्काळ एमजीएम रुग्णालय भिवंडी या ठिकाणी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी ५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून या टोळीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community