२५ ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा; रवींद्र चव्हाण यांची सूचना

189

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्गे प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरस्तीची कामे २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या आणि पूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारच्या बैठकीत दिल्या.

( हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका तयार करण्याबाबत विचार – फडणवीस )

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कंत्राटदारावर नजर ठेवा

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.