मुंबई विमानतळाजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आलेल्या निनावी कॉलमुळे खळबळ उडाली आहे. कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या ‘ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचे सांगत ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या कुटुंबियाना लक्ष्य करण्यात आले असल्याची धमकी दिली आहे.
या अज्ञात कॉलमुळे एकच खळबळ उडाली असून हॉटेल व्यवस्थापकांनी या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बॉम्ब स्क्वाॅडच्या मदतीने संपूर्ण हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलमध्ये कुठलेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community