शहापूर जिल्ह्यातील उंबरखांड येथील खर्डी गावात मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या घरात शिरला. लहू निमसे यांच्या घरी बिबट्या शिरल्याने एकच हल्लाकोळ माजला. घरातील माणसे आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडली. रात्री गाढ झोपेच्या वेळेत अचानक बिबट्या घरात शिरल्याने घरातील सदस्य घाबरले आणि त्यांनी पळ काढला. या बिबट्याच्या हल्ल्यात कोणाला दुखापत झाली का याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तब्बल अकरा तासानंतर बिबट्याला घरातच बेशुद्ध करुन वनाधिका-यांनी जेरबंद केले.
शहापूर जिल्ह्यात ब-याचशा घरातील पोटमाळे तसेच घराच्या छप्पराजवळील भाग हा उघडा ठेवला जातो. बिबट्या घरातील पोटमाळ्यातून शिरला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, मात्र बिबट्या दरवाजातून शिरला. सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी बोरिवलीहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम मुंबईहून रवाना झाली होती तोपर्यंत घराबाहेर जमलेल्या गर्दीला पोलिसांनी आवरुन ठेवले होते. दुपारी एकच्या सुमारात बिबट्याला वन्यप्राणी बचाव पथकाच्या टीमने बेशुध्द करुन जेरबंद केले. बिबट्याची शारीरिक तपासणी पूर्ण झाली असून तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे. ही अडीच वर्षांची मादी असून नव्या क्षेत्राच्या शोधात चुकून मानवी वस्तीत शिरली असावी, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.
महिलेची प्रसंगावधानता
घराच्या मागच्या दरवाज्यातील कोंबड्याचा आवाज ऐकून महिला दरवाजा उघडून घराबाहेर आली. घरात लहू निमसे आणि त्यांची मुले खोलीत झोपली होती. घरात येताच लहू निमसे यांच्या पत्नीला बिबट्या दिसला. बिबट्याची ओरड ऐकतच त्या खोलीत पळाल्या आणि दार बंद केले. बिबट्या घरात शिरल्याचे कळताच लहू निमसे यांनी मुलांनाही जागे केले. बिबट्यानेही पोटमाळ्यावर उडी घेतली. संधीचा फायदा घेत निमसे दाम्पत्य खोलीबाहेर आले. बिबट्या जवळ नसल्याने त्यांनी घराबाहेर धूम ठोकली. घराचे दोन्ही दरवाजे निमसे यांनी बंद केल्याने बिबट्या घराबाहेर आला नाही. लहू निमसे यांच्या प्रसंगावधानतेमुळे गावकऱ्याचे रक्षण झाले,यासाठी वनविभागानेही त्यांचे कौतुक केले.
घरावरील खिडकी तोडली
बिबट्याला घरातून जिवंत पकडताना घातपाताची शक्यता होती. वन्यप्राणी बचाव पथकाने घराच्या छपराजवळ असलेली खिडकी तोडली. तिथून पोट माळ्यावर बसलेला बिबट्या दिसत होता. पथकातील एका सदस्याने बंदुकीत भरलेले इंजेक्शन बिबट्याच्या शरीरावर अचूक हेरले आणि बिबट्या बेशुद्ध झाला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन तासात वन्यप्राणी बचाव पथकाने बिबट्याला जेरबंद केले.
जेव्हा बिबट्या घरात शिरतो…
शहापूर जिल्ह्यातील उंबरखांड येथील खर्डी गावात मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या घरात शिरला. तब्बल अकरा तासानंतर बिबट्याला घरातच बेशुद्ध करुन वनाधिका-यांनी जेरबंद केले.#leopard #animal #animalrescue pic.twitter.com/wLoG1k1MfP— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 23, 2022
( हेही वाचा: पेंच व्याघ्र प्रकल्पातील जलाशयात वाघाचा मृतदेह )
Join Our WhatsApp Community