दोन प्रियकरांची गोष्ट: कर्जापायी एकाने स्वतःला संपवले, तर दुसऱ्याने स्वतःचेच अपहरण केले

153
ठाणे जिल्ह्यातील कळवा आणि उल्हासनगर शहरात प्रेमापोटी कर्जबाजारी झालेल्या दोन प्रियकरांच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत प्रेयसीला कर्ज काढून देणाऱ्या प्रियकराने बँकेने कर्जासाठी तगादा लावल्याने आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत प्रेयसीला भेट म्हणून दिलेल्या महागड्या मोबाईल फोनचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अपहरण करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी सबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीच्या धमकीमुळे प्रियकराने केली आत्महत्या

कळव्यातील रमाबाई आंबेडकर सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या २४ वर्षीय विक्रम मोरे या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने प्रेयसीला एका खाजगी फायनान्स कंपनीतून ५० हजार रुपयांचे कर्ज काढून दिले होते, ते कर्ज फेडू न शकल्यामुळे फायनान्स कंपनीने पैशांसाठी तगादा लावला होता. याबाबत त्याने प्रेयसीला कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितले असता, तीने उलट त्याचीच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. एकीकडे फायनान्स कंपनीवाले पैशांसाठी तगादा लावत होते, तर दुसरीकडे प्रेयसी त्याला धमकी देत असल्यामुळे दोन्हीकडून कात्रीत अडकलेल्या विक्रमने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
दरम्यान उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथे राहणाऱ्या विजय भारती (२२) या तरुणाने प्रेयसीला महागडा मोबाईल फोन हप्त्यावर घेऊन दिला होता. मात्र  हप्ते भरू न शकल्याने विजयकडे खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली विभागाने तगादा लावल्यामुळे विजयने स्वतःचे अपहरण झाल्याचा कट रचून दुसऱ्याच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून ‘तुम्हारे बेटे विजय  को सहीसलामत देखना चाहते हो, तो २ लाख देना पडेगा’, अशी धमकी दिली. वडिलांनी तत्काळ मद्ध वर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेऊन विजय याचा शोध घेऊन कर्नाटक राज्यातून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच अपहरणाचा खोटा कट रचला होता अशी माहिती दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.