विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज विरोधी पक्षांकडून सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली जात आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे त्यात अग्रभागी असतात. मात्र, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात त्यांचा ‘करुणा’मय इतिहास बाहेर काढताच, ते मंगळवारी घोषणाबाजीतून गायब झाल्याचे पहायला मिळाले.
मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू असताना, शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. एरवी घोषणाबाजीने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडणारे धनंजय मुंडे त्यात दिसले नाहीत. त्यांना येण्यास उशिर झाला, जाणिवपूर्वक येणे टाळले, की मुख्यमंत्र्यांचे बोलणे त्यांनी मनावर घेतले, अशा चर्चा दिवसभर सुरू होत्या.
( हेही वाचा: ‘बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि…’ राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली ‘त्या’ शेवटच्या भेटीची आठवण )
मुख्यमंत्री काय म्हणाले?
- धनंजय मुंडे परवा सभागृहाबाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. एवढ्या जोरात की, अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक आहेत, अशी शंका यावी. त्यांचा सगळा प्रवास आम्हाला माहिती आहे.
- एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर प्रेम, दया आणि ‘करुणा’ दाखवली होती, पण पुनःपुन्हा दाखवता येणार नाही, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली.
- दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीच्या आधी काही तास मुख्यमंत्र्यांनी ‘करुणा’ शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे ही भेट पूर्वनियोजित होती का, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.