‘त्या’ मृत गोविंदाच्या कुटूंबियांना तत्काळ दहा लाखांची मदत

175
दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले, त्यांना योग्य उपचार मिळावेत, असे निर्देश नियंत्रण पथकास दिले होते. जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये, असा हेतू त्यामागे होता. मात्र, विलेपार्ले येथील संदेश दळवी (२३) या गोविंदाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना तातडीने दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, कोरोना कालावधीत दोन वर्ष सण साजरे करता आले नाहीत. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने पारंपरिक सण साजरे करण्यात येत आहेत. नुकताच दहिहंडी उत्सव साजरा झाला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मृत गोविंदांच्या कुटूंबियांना १० लाख, दोन अवयव गमावल्यांना ७.५० लाख, जखमींना ५ लाख रुपये आणि सर्वांवर मोफत उपचाराची घोषणा केली होती.
जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सात अधिकाऱ्यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.