‘वधू-वरांनाही खेळाचा दर्जा देऊ’, दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

157

दादरच्या रविंद्र नाट्यगृहात मंगळवारी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेशी संवाद साधला. आपल्या पायावरील शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे भाषण करत होते. त्यामुळे ते यावेळी कोणावर तोफ डागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयांवर निशाणा साधला आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकताच जाहीर केला. त्यावरुनही राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

(हेही वाचाः ‘बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि…’ राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली ‘त्या’ शेवटच्या भेटीची आठवण)

वधू-वरांनाही खेळाचा दर्जा देऊ

सध्या राजकारणासारख्या गंभीर विषयाला आताच्या सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण राजकारणाला खेळाचा दर्जा दिला आहे. आता दहीहंडीला हा दर्जा आपण दिला आहे. मग हळहळू कोजागिरी, मंगळागौर यांनाही खेळाचा दर्जा देऊ. खरंतर लग्न झाल्याझाल्या वधू-वरांनाही खेळाचा दर्जा द्यायला हवा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे.

हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात जे राजकारण चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. ज्या मतदाराने 2019 च्या निवडणुकीत मतदान केले आहे त्याला कळतही नसेल की आम्ही मतदान कोणाला केले आहे. कोण-कोणात मिसळलंय आणि कोण-कोणापासून लांब गेलंय हे कळतंही नाही. हे खरं राजकारण नाही. ही सत्तेची तात्पुरती अ‍ॅडजस्टमेंट आहे. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सध्या महाराष्ट्रात उत्तर भारतातील राजकारण शिरायला लागले असून राज्यातील जनतेने याबाबत जाब विचारायला हवा, असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘ही सत्तेची अ‍ॅडजस्टमेंट’, शिंदे-फडणवीस सरकारबाबत राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.