मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण केले जाणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई शहरातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्त, विविध अधिकारी आणि तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया आणि कार्यवाही पूर्ण केली जात आहे. हे काम विहीत काळात पूर्ण केले जाईल याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
संयुक्त समिती नेमणार
मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाचा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पात समावेश केला जाईल. या रस्त्यावरील काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथे व्यावसायिक उपक्रम चालवले जातात. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील. त्याचबरोबर याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती यांची एक समितीही नियुक्त करण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.