जखमी कासवाला विनापरवाना पुण्यात नेणाऱ्या महिला वन्यजीव छायाचित्रकाराचे करिअर धोक्यात

122

पनवेलहून स्टार टर्टल प्रजातीच्या जखमी कासवाला पुण्यात खासगी प्राणीप्रेमी संस्थेला देण्यापूर्वी वनविभागाला न कळवण्याचे प्रकरण २५ वर्षीय महिला वन्यजीव छायाचित्रकाराला चांगलेच भोवले आहे. या महिला वन्यजीव छायाचित्रकाराची सोमवारी तब्बल ६ तास वनविभागाकडून चौकशी झाली. प्रकरण उघडकीस आल्याने एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकाने तिच्यासोबतचे कंत्राट रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणातून वन्यजीव क्षेत्रात करिअर करणा-या तरुणांनी वन्यजीव संवर्धनाचे मूलभूत नियम समजून घेणे आवश्यक आहे, असा मुद्दा वन्यजीव अभ्यासकांनी मांडला.

( हेही वाचा : गणेशोत्सवात रात्री विशेष ‘बेस्ट’ बससेवा; प्रवाशांसाठी २५ गाड्यांचे नियोजन)

पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेला पनवेलहून जखमी स्टार टर्टल प्रजातीचे कासव देण्यासाठी संबंधित महिला वन्यजीव छायाचित्रकाराने लांबचा प्रवास का केला, हा मूळ प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वन्यप्राण्यांच्या तस्करी, बचावासाठी वनविभागाची १९२६ ही हेल्पलाईन उपलब्ध आहे. गेल्या सात वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करणा-या तरुणीला हेल्पाईनबाबत माहित नसणे संशयास्पद असल्याचा मुद्दा वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केला. पनवेल फार्महाऊसजवळ स्टार टर्टल कासव जखमी अवस्थेत सापडले. या फार्महाऊसजवळील नाल्याजवळ कासव आढळले , अशी माहिती महिला वन्यजीव छायाचित्रकाने वनाधिका-यांना दिलेल्या जबानीत दिली. वनाधिका-यांनी तातडीने फार्महाऊस जवळील नाल्याजवळ छापा मारला, मात्र इतर स्टार टर्टल प्रजातीचे कासव तेथे आढळले नाहीत. कासव नेमके कुठून सापडले, कासव मूळ कोणत्या ठिकाणाहून महिलेने आणले, या सर्व घटनाक्रमाबाबत वनाधिका-यांना संशय आहे.

कासव तस्करीतून आणले गेल्याचा वनाधिका-यांना संशय आहे. त्यामुळे महिला वन्यजीव छायाचित्रकाराविरोधात नोंदवलेला गुन्ह्याचे स्वरुप निश्चितच मोठे असल्याची प्रतिक्रिया वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली. संपूर्ण तपास किमान तीन महिने सुरु राहील, कदाचित पुढील तपासासाठी संबंधित महिला वन्यजीव छायाचित्रकाराचा जबाब पुन्हा नोंदवला जाईल, असेही वनाधिका-यांनी सांगितले.

या अगोदरही वादाच्या भोव-यात

ताडोबातील प्रसिद्ध वाघांच्या डोक्युमेंटरीवरुनही संबंधित महिला वन्यजीव छायाचित्रकार वादाच्या भोव-यात अडकली आहे. ताडोबातील प्रसिद्ध माया वाघीणीच्या छायाचित्रणाचे तसेच व्हिडिओचे छायाचित्रण एका प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकाराने केले होते. हे फुटेज स्थानिक माणसांकडून तिने मिळवत स्वतःच्या नावे माया वाघीणीची डोक्युमेंटरी बनवली. हा प्रकार मूळ वन्यजीव छायाचित्रकाराला कालांतराने लक्षात आला. महिला वन्यजीव छायाचित्रकार मुंबईत असताना ताडोबातील वाघाची डॉक्युमेंटरी कशी बनवते, अशी चर्चाही रंगली. संबंधिताने रितसर तक्रार न केल्याने या वादावर पडदा पडला.

कासवाप्रकरणी वनविभागाने लावलेले कलम

बेकायदेशीररित्या वन्यजीव बाळगणे तसेच वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार कलम ९, ३९, ४४, ४८, ४८(अ) ही कलमे तरुण महिला वन्यजीव छायाचित्रकाराविरोधात वनविभागाने लावली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.