भुजबळ, खडसेंमुळे चर्चेत आलेला ‘रामटेक’ बंगला दीपक केसरकरांकडे

150

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवोदित मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले असून, त्यातही भाजपचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसेंमुळे चर्चेत आलेला ‘रामटेक’ बंगला दीपक केसरकरांच्या वाट्याला आला आहे.

( हेही वाचा : मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, मराठा आंदोलक सहाव्या माळ्यावर पोहचले)

‘रामटेक’मध्ये असताना माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांच्या मागे शुक्लकाष्ट लागल्यामुळे हा बंगला घेण्यास बरेचजण धजावत नाहीत. भुजबळ १९९९ ते २०१४ पर्यंत या बंगल्यात वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. एकनाथ खडसे यांना २०१४ मध्ये हा बंगला मिळाला. पुढे त्यांनाही मंत्रिपद सोडावे लागले होते.

मलबार हिलमधील प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बंगले मिळण्यासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. त्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे आर्जवही केले होते. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांना लोहगड, गिरीश महाजन सेवासदन, तर रवींद्र चव्हाण यांना रायगड बंगला देण्यात आला आहे.

कोणाला कुठला बंगला?

  1. राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
  2. सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
  3. चंद्रकांत पाटील – ब-१ (सिंहगड)
  4. विजयकुमार गावीत – चित्रकुट
  5. गिरीश महाजन – सेवासदन
  6. गुलाबराव पाटील – जेतवन
  7. संजय राठोड – शिवनेरी
  8. सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
  9. संदिपान भुमरे – ब-२ (रत्नसिंधु)
  10. उदय सामंत – मुक्तागिरी
  11. रवींद्र चव्हाण – अ-६ (रायगड)
  12. अब्दुल सत्तार – ब-७ (पन्हाळगड)
  13. दीपक केसरकर – रामटेक
  14. अतुल सावे – अ-३ (शिवगड)
  15. शंभूराज देसाई – ब-४ (पावनगड)
  16. मंगल प्रभात लोढा – ब- ५ (विजयदुर्ग)

मलबार हिलमधील बंगल्यांसाठी आग्रह

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले, तर अन्य मंत्र्यांना मंत्रालयासमोरची निवासस्थाने दिली जातात. मलबार हिलमधील बहुतांश बंगले हे समुद्र किनाऱ्याला लागून असून, आकाराने मोठे आहेत. शिवाय त्यांची रचनाही प्रशस्त अशी आहे. याऊलट मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेने लहान असल्याने मलबार हिलमध्ये बंगला मिळावा, यासाठी राज्यमंत्रिमंडळातील सर्वच मंत्री प्रयत्नशील असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.