मुंबईत टोल दरात होणार वाढ; असे असतील नवे दर

202

राज्यासह देशामध्ये सध्या कोरोनाचे संकट असून या कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. अनेक ऑफिसेस सुरु झाल्यामुळे चाकरमानी आपली वाहने घेऊन कार्यालय गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लगाणार आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल  दरात ५ ते २५ रुपयांनी दरवाढ होणार आहे.

असे असतील नवे दर

कार, जीपसारख्या चारचाकी हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून. त्यांना ३५ रुपयांच्या ऐवजी चाळीस रुपये टोल द्यावा लागेल. मिनी बससारख्या मध्यम वाहनांच्या टोल दरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ५५ रुपयांवरून ६५ रुपये करण्यात आला आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात १०५ वरून १३० अशी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल १३५ रुपयांवरून १६० रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे. केवळ एका टोलसाठी असलेला मासिक पास आता १२४० रुपये करण्यात आला असून, पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४००  रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

मुंबईत या टोलनाक्यावर भरावा लागणार टोल

मुलुंड, वाशी, दहीसर, ऐरोली, लाल बहाहूर शास्त्री मार्गावर हे पाच टोल नाके आहेत. त्यामुळे आता मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात ५ ते १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी ही टोलच्या दरात वाढ होत असते त्यानुसार ही वाढ होत आहे.  २००२ ते २०२७ अशी २५ वर्षे उड्डाणुलांच्या देखभालीसाठी हा टोल वसुल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०१७ नंतर आता २०२० मध्ये टोल दर वाढ केली जात आहे.

भाजपाचा आंदोलनाचा इशारा

मुंबईच्या याच टोल नाक्यावरून प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करतात. शिवसेनेने मागच्या निवडणुकीत या टोलपासून कायमची मुक्ती देऊ असे आश्वासन मुंबईकर आणि ठाणेकरांना केले होते. मात्र टोलमुक्ती शक्य नसल्याचे काही दिवसांपूर्वीच नगर विकास मंत्रालयाने स्पष्ट केले. या खात्याचा कारभार ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे भाजप आमदार संजय केळकर यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.