सणासुदीच्या दिवसात राज्यात घातपात करण्याचा कट दहशतवादी संघटनांकडून रचला जात आहे. या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर मुंबई पुण्यातील पंचतारांकित हॉटेल आहेत. राज्यातील सुरक्षा यंत्रणांकडून या हॉटेलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, तपास यंत्रणेलादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने (एटीएस) काही महिन्यांपूर्वी लष्कर-ए- तैयबा या संघटनेचा संशयित दहशतवादी जुनेद खान याला पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. जुनेदच्या चौकशीत एटीएसच्या हाती महत्वाची माहिती समोर आली होती. मुंबई पुणे या दोन शहरांना दहशतवादी संघटनांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचे तसेच या शहराची रेकी देखील करण्यात आली असल्याचे जुनेदच्या चौकशीत समोर आले होते.
( हेही वाचा: ‘लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून बारामतीच्या पोपटाने बरळू नये’, मनसेचा दानवेंना थेट इशारा )
एटीएसने या अनुषंगाने तपास सुरू करून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश शहरातील काही भागांत छापेमारी केली होती. या छापेमारीत अनेक महत्वाचे पुरावे एटीएसच्या हाती लागले होते. एटीएसच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा मुंबई पुण्यावरील हल्ल्याचा कट उधळला गेला आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात मिळून सापडलेली बोट आणि त्यात सापडलेला शस्त्रसाठा तसेच मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला आलेले हल्ल्याचे मेसेज, त्याचबरोबर काही पंचतारांकित हॉटेलमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे निनावी कॉलमुळे मुंबई पुण्यात दहशतवाद्याकडून घातपाताची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. यादरम्यान विमानतळ येथील एका पंचतारांकित हॉटेलला आलेला निनावी कॉल त्याचबरोबर पुण्यातील काही पंचतारांकित हॉटेल दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याचे पुणे एटीएसने अटक केलेल्या जुनेदच्या चौकशीत समोर आले आहे. तपास यंत्रणादेखील सतर्क झाली असून, पंचतारांकित हॉटेल प्रेक्षणीय स्थळ, समुद्र किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य तपास यंत्रणेसह केंद्रीय तपास यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. राज्यात अथवा देशात ऐन सणासुदीच्या दिवसात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता सुरक्षा तसेच तपास यंत्रणेकडून घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community