बीडीडी चाळीत पोलिसांना २५ लाखांहून कमी किमतीत घरे देणार – फडणवीस

95

बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना ५० लाख रुपयांत घर देण्याचा निर्णय घेतला. परंतु, इतके पैसे भरणे त्यांना परवडणारे नाही. आम्ही बीडीडीतील पोलिसांना २५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत घर देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

( हेही वाचा : कोकणात २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी)

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पोलीस गृहनिर्माण संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. मोठ्या प्रमाणात घरे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलिसांना चांगली घरे मिळतील, याची काळजी घेतली जाईल.

गृहनिर्माण क्षेत्रात पुनर्विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. रखडलेले प्रकल्प पाहता अनेक पर्यायांवर काम केले जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा ‘डीपीआर’ २०१६ साली पूर्ण करण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वेची जागा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपये भरले आहेत. केंद्राशी काही बाबतीत चर्चा सुरू आहे. ३० तारखेपर्यंत त्याचा निर्णय होईल. त्यानंतर नव्याने निविदा मागवून या प्रकल्पाला गती देण्यात येईल. आशियातील सर्वात मोठा असा हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

गिरणी कामगारांसाठी ५० हजार सदनिका लवकरच

गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. ती त्यांना देण्यात येतील. म्हाडा पुनर्विकासातील रहिवाशांना सद्या जे भाडे कमी दिले जाते आहे, ते २५ हजार रुपये देण्यात येईल.

‘एसबीटीयू’ हा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. पण यात रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आणि विकासकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न झाला. बदललेला आराखडा योग्य नाही. त्यामुळे पूर्वीचा आराखडा कायम ठेवण्यात येईल. यात कुणाचा फायदा याची चौकशी सुद्धा करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.