क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

137

देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा शिवराम हरि राजगुरू जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही

राज्यपाल म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत देशसेवेसाठी नागरिकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रियेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीत राष्ट्रप्रेम वाढीस लागेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

खासदार डॉ.कोल्हे म्हणाले, देशासाठी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. ‘राष्ट्रप्रथम’हा संस्कार रुजवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत क्रांतिकारकांचा इतिहास सांगावा लागेल. आमदार मोहिते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

क्रांतिकारकांना अभिवादन

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज किरणजीत सिंग, हुतात्मा बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद यांचा विशेष गौरव करण्यात आला. खेड पंचायत समितीने तयार केलेली ‘नमन हुतात्मा राजगुरू’ ही चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. प्रास्ताविक सत्यशील राजगुरू यांनी केले. कार्यक्रमाला विविध राज्यातील प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी हुतात्मा स्मृतीस्थळ, हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ तसेच आपटे वाडा येथे भेट दिली व क्रांतिकारकांना अभिवादन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.