संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

138

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दैनंदिन देखभालीसाठी नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसणे प्राण्याच्या जीवावर बेतले आहे. उद्यानात प्रकृती बिघडलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याचा मृत्यू झाला आहे. इतर दोन बछड्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. वैद्यकीय दुर्लक्षामुळे बळी गेलेल्या या बछड्याच्या मृत्यूसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाची वनविभागाकडून चौकशी करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून केली जात आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

( हेही वाचा : २०० लीटर रक्त वाया गेल्याप्रकरणी राजावाडी रुग्णालयाला नोटीस )

नाशिकमध्ये आईपासून दूरावलेल्या काही दिवसांच्या तीन बछड्यांना वनविभागाने एप्रिल महिन्यात पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी सुपूर्द केले होते. तिन्ही बछड्यांना १० जून रोजी रेस्क्यू या प्राणीप्रेमी खासगी संस्थेकडून उपचार मिळाल्यानंतर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवाना करण्यात आले होते. बछड्यांना कायमस्वरुपी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता. त्यावेळी तिन्ही बछडे पायावर उभे राहत होते. दहा-पंधरा दिवसांनी बछड्यांनी पायावर उभे राहणे बंद केले. ८ ऑगस्ट रोजी रक्ततपासणीत तिन्ही बछड्यांमध्ये ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियमची कमतरता असल्याचे निष्पन्न झाले. चेंबूरच्या खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यात अॅक्युपंक्चरच्या उपचारपद्धतीही सुरु झाल्या. उपचार मध्यावर सोडून तिन्ही बछड्यांना वनाधिका-यांनी पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे सुपूर्द केले. तिघांपैकी दोन बछड्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चरही होते. यातील मादी बछड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मादी बछड्याची प्रकृती गंभीर होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तिला हाडांचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अनुवांशिक आजार असून, शरीरात कॅल्शियमचे प्रमाण घटत राहते. इतर दोन्ही बछड्यांनाही हा आजार आहे. दोघांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा  झालेली नाही.
– नेहा पंचमिया, प्रमुख, रेस्क्यू

ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्राण्यांना गेल्या आठवड्यात तातडीने पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.