दहीहंडी खेळताना सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या गोविंदाचा मृत्यू झाला. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (३६) याला अटक केली आहे. उत्सवादरम्यान सहभागी गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
दळवी कुटुंबीय सध्या कुर्ल्यात वास्तव्यास आहेत. मात्र आधी ते विलेपार्ल्यात राहत होते. त्यामुळे संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. पार्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात त्याचा सातव्या थरावरून पडून मृत्यू झाला. दहीहंडी उत्सवाचा आयोजक शेख याने दहीहंडी फोडण्यासाठीचे मनोरे रचणाऱ्या गोविंदांना कोणतीही सुरक्षाव्यवस्था दिली नव्हती. त्यामुळे शेखवर सुरुवातीला मानवी जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संदेशच्या मृत्यूनंतर ३०४ (अ) मध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले.
( हेही वाचा: शिंदे गटाच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे; विधीमंडळाच्या पाय-यांवर व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी )
सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष
शेखच्या अटकेबाबत बोलताना विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर यांनी सांगितले की, शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संदेशचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या गोविंदावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community