आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणाने बालमृत्यू होत असल्यासंदर्भात विधानसभेत चर्चा सुरू असताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केल्याने सत्ताधारी आमदारांनी त्यावर आक्षेप घेतला. तसेच तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अध्यक्षांकडे केली.
कुपोषणामुळे राज्यात एकही बालमृत्यू झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सभागृहात दिली. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही, मंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. शिवाय समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विरोधकांनी सभात्यागही केला.
दरम्यान, याच प्रश्नाला धरून शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात बोलत होते. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. देशाच्या राष्ट्रपती पदावर एका आदिवासी महिलेला बसवून या समाजघटकाचा सन्मान आपण केला. पण आदिवासी वस्त्या, पाडे यांची स्थिती पाहिल्यास आपल्याला ‘लाज वाटली पाहिजे’, असे ठाकरे म्हणाले.
( हेही वाचा: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी जाणार, निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे शिफारस )
सत्ताधाऱ्यांनी नोंदवला आक्षेप
‘लाज वाटली पाहिजे’, हा असंसदीय शब्द उच्चारून आदित्य ठाकरे यांनी सभागृहाचा अवमान केला आहे. गेल्या महिन्यापर्यंत त्यांचे वडील मुख्यमंत्री पदावर होते. मग ते आपल्या वडिलांबद्दल बोलत आहेत का? असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसेच हा शब्द रेकॉर्डवरून काढून टाकावा आणि असंसदीय शब्द वापरल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या इतर सदस्यांनी केली.
रेकॉर्ड तपासून पाहणार – अध्यक्ष
विधिमंडळाचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी असंसदीय शब्द उच्चरल्याची तक्रार काही सदस्यांनी केली आहे. त्याची नोंद घेऊन रेकॉर्ड तपासले जाईल आणि तो शब्द रेकॉर्डवरून काढला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली.
Join Our WhatsApp Community