राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कंत्राटी असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले असून, उद्धव गटाचा उल्लेख ‘टोमणे सेना’ असा केला आहे. शिंदे म्हणाले, ‘होय, मी कंत्राटी आहे, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट, राज्य समृद्ध करण्याचं, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलंय’.
( हेही वाचा : रात्रशाळांतील दर्जा सुधारण्यासाठी परिपूर्ण धोरण तयार करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याबद्दल एक शब्द उच्चारला होता. हा मुख्यमंत्री पदाचा अवमान समजून त्यांना अटक केली होती. मग महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला कंत्राटी म्हणणे अवमानात बसत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले.
आम्ही गद्दार नव्हे, खुद्दार!
पोराटोरांबरोबर लागून राष्ट्रवादीची मंडळीही आम्हाला गद्दार म्हणू लागली आहेत. त्यांना एकच सांगायचे आहे, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस-राष्ट्रवादी आपले विरोधक आहेत. त्यांना कधी जवळ करायचे नाही. त्यांना जवळ केले तर मी दुकान बंद करीन. हाच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. आमच्या दौऱ्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक गर्दी करतात, स्वागताला येतात. आम्ही गद्दार असतो, तर लोकांनी पाठ फिरवली असती. आम्ही खुद्दार आहोत. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली, त्यांच्याशी आम्ही फारकत घेतली, असा पलटवार शिंदे यांनी केला.
तुम्ही माझ्या कलागुणांना वाव दिला नाही…
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कविता, शाब्दिक कोटी आणि वाक्प्रचारांचा आधार घेत जोरदार टोलेबाजी केली. त्यावर हे कोणी लिहून दिले, असा प्रश्न विरोधकांनी विचारला. ‘माझ्या अंगी हे गुण आधीपासूनच आहेत. तुम्ही मला कधी कामच करू दिले नाही, माझ्या कलागुणांना कधी व्यासपीठ दिले नाही. त्यामुळे आता सगळं बाहेर येतंय’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community