एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मान्यताप्राप्त एसटी संघटनेचे २९ऑगस्टला उपोषण आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेने दिला आहे.
( हेही वाचा : नवी मुंबईतील आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारामुळे सर्व आश्रमशाळांची चौकशी करणार – आदिवासी विकासमंत्र्यांची घोषणा )
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या
महागाई भत्ता, कोविड भत्ता, कोर्ट केसेस, स्वेच्छा निवृत्त योजना, सातवा वेतन आयोग, वेतनवाढीतील विसंगती दूर करणे, मॅक्सिकॅबला परवाने देऊ नये अशा अनेक मागण्या पत्रकातून करण्यात आल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२ पासून थकबाकीसह महागाई भत्ता ३४ टक्के देण्याचा निर्णय दिला जातो मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्केच महागाई भत्ता दिला जात आहे. तसेच इतर काही प्रश्नांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे एसटी संघटनेच्या परिपत्रकात म्हटले आहे.
या मागण्यांची दखल न घेतल्यास मान्यताप्राप्त एसटी संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास १९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा कर्मचारी संघटनेने परिपत्रकामार्फत दिला आहे.
Join Our WhatsApp Community