बिबट्याच्या भ्रमणमार्गात फार्महाऊस ठरताहेत अडथळा

176

कर्जत, शहापूर आणि मुरबाड परिसरात फार्महाऊस पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तानसा तलाव आणि पुण्यातील भीमाशंकर अभयारण्याला जाणाऱ्या बिबट्याच्या भ्रमणमार्गला धोका पोहोचू लागला आहे. या भागात बिबट्याचा मानवी वस्तीजवळील वावर भ्रमणमार्गतील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा आरोप ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी केला आहे.

( हेही वाचा : सरकारकडून मुंबईकरांना दिलासा; मालमत्ता करात आणखी वर्षभर वाढ नाही )

नुकतेच शहापूर जिल्ह्यातील उंबरखांड येथील खर्डी या गावात अडीच वर्षांचा बिबट्याचा मादी बछडा शिरला होता. मुरबाडमध्येही गेल्या काही वर्षांत बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला केल्याच्या नोंदी आहेत. काही वर्षांपूर्वी बदलापूर शहरांत बिबट्या येऊन गेला. वर्षभरापूर्वी बदलापूर येथील फार्महाऊसजवळ पाण्याच्या रिकाम्या बाटलीत तोंड अडकल्याने बिबट्या फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वनविभागाने खास शोधमोहीम राबवून बिबट्याचे पाण्याच्या रिकाम्या बाटलीतून तोंड बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. पुण्यातून उस्ताद नावाच्या बिबट्याने कल्याणजवळ तीन महिने वास्तव्य केले. या घटना पाहता बिबट्याचा तानसा ते भीमाशंकर अभयारण्यादरम्यानच्या भ्रमणमार्गाला बाधा पोहोचत असल्याचे हरड यांनी नमूद केले.

बिबट्याचा वावर वाढल्याने…

शहापूर आणि कर्जत भागातील बैठ्या घरांना बंद छप्पर नाही. मानवी वस्तीजवळील गायी, कोंबड्या, कुत्रे खाण्यासाठी बिबटे येण्याची दाट शक्यता असते. बिबट्या घरात शिरू नये, यासाठी आता घराच्या रचनांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत हरड यांनी व्यक्त केले आहे.

बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढल्यास

  • बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात सायंकाळनंतर बाहेर पडू नका.
  • सायंकाळनंतर घराबाहेर जायचे असल्यास जमावाने बाहेर जा. सोबत हातात काठी आणि टॉर्च असू द्या.
  • बाहेर फिरत असताना जोरजोरात गाणी गा किंवा मोबाईलवर गाणी लावा. जेणेकरून बिबट्याला आजूबाजूला माणसाचा वावर असल्याची कल्पना येईल.
  • रात्री रस्त्यांवर लाईट लावा तसेच परिसरात पुरेशी स्वच्छतागृहे बांधा.
  • पाळीव जनावरे सायंकाळनंतर घरात घ्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.