चवन्नी गल्ली कृत्रिम तलाव : मुख्यमंत्री शिंदे आणि उध्दव शिवसेना समर्थकांमध्ये श्रेयाची लढाई

128

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आगामी गणेशोत्सवाकरता गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे याकरता कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे. याअंतर्गत प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील कृत्रिम तलावाच्या निर्मितीत शिवसेना फुटून शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर व माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यामध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. या कृत्रिम तलावाच्या उभारणीसाठी आमदार सदा सरवणकर गुरुवारी दहा वाजता श्रीफळ वाढवणार याची माहिती मिळाल्याने माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि त्यांचे पती हरिष वरळीकर यांनी सकाळी ९ वाजताच जावून श्रीफळ वाढवले. त्यामुळे या सरवणकर आणि वरळीकर यांच्यातच आता या कृत्रिम तलावाच्या बांधकामावर शाब्दीक चकमकही उडाल्याचे पहायला मिळाले आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या आणखी दोन उपायुक्तांची खांदेपालट… )

मुख्यमंत्री शिंदे आणि उध्दव शिवसेना समर्थकांमध्ये श्रेयाची लढाई

मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी १७३ कृत्रिम तलावे निर्माण करण्यात आली होती आणि त्यामध्ये सुमारे ७९ हजार १२९ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही १६२ कृत्रिम तलाव करण्याचा निर्धार केला असून त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालयांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जी दक्षिण विभागातील मुरारी घाग मार्ग चवन्नी गल्ली मैदानात गणेश भक्तांना घराच्या शेजारी आणि पर्यावरण पुरक विसर्जन स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षीही ही सुविधा गणेश भक्तांना करून दिली जात आहे.

चवन्नी गल्ली मैदानात गुरुवारी कृत्रिम तलाव उभारण्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी दहा वाजता होणार होता. परंतु तत्पूर्वीच या प्रभागातून २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या माजी शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी कामाच्या शुभारंभाचे श्रीफळ वाढवले. त्यानंतर आमदार सदा सरवणकर व माजी नगरसेवक सदा सरवणकर तिथे आल्यानंतर त्यांची शाब्दिक चकमक उडाल्याचे बोलले जाते. महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने माजी नगरसेवकाला श्रीफळ वाढवण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांनी श्रीफळ कसे वाढवले असा युक्तीवादही करण्यात आला आहे. अशाप्रकारे महापालिका कामांचा शुभारंभ करण्याचा अधिकार स्थानिक आमदारांना असल्याचे सांगत सरवणकर यांनी याला आक्षेप घेतला. त्यानंतर सरवणकर यांनी स्वत:ही याचे श्रीफळ न वाढवता जी दक्षिण विभागाचे सहायक अभियंता मनोज पाटील यांच्या हस्ते याचे श्रीफळ वाढवले.

हेमांगी वरळीकर यांनी शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने हे कृत्रिम तलाव बांधण्यात येत असल्याचे बॅनर लावले. परंतु याठिकाणी सन २०१२-१३मध्ये तत्कालिन मनसे नगरसेवक संतोष धुरी यांच्या प्रयत्नाने हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. तेव्हापासून या मैदानात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे. या तलावामध्ये कुणीही भक्त गणेश मूर्ती विसर्जन करायला तयार नसायचे, परंतु धुरी यांनी घरोघरी जात लोकांमध्ये जनजागृती करत या तलावांमध्ये विसर्जन करायला भाग पाडले. तेव्हापासून हे कृत्रिम तलाव बनवण्यात येत असून आमदारांनीही याचे श्रीफळ सहायक अभियंता यांच्यामार्फत वाढवून याचे प्रशासकालाच याचे श्रेय दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.