गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना बनावे लागले ‘झोमॅटो बॉय’

144
विविध रूपे धारण करून पोलीस गुन्हेगारांपर्यंत कसे पोहचतात.  हे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत दाखवले जाते. असेच काहीसे मुंबईत घडले आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या टोळीचा माग काढण्यासाठी मुंबई पोलीस चक्क ‘झोमॅटो बॉय’ बनले आणि इराणी टोळीच्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले. फिरोज नसीर शेख आणि जाफर युसूफ जाफरी असे अटक करण्यात आलेल्या इराणी टोळीतील दोघांची नावे आहेत. हे दोघे स-हाईत सोनसाखळी चोर असून मुंबई ठाण्यात दोघांवर ३५ ते ४० गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरात एकापाठोपाठ एक अशा चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्याची दखल परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा माग घेण्याचा आदेश दिला होता.
या पथकाने पश्चिम उपनगर, पश्चिम महामार्ग, ठाणे घोडबंदर रोड या परिसरातील सुमारे ३०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता, एका मोटारसायकलवर दोघेजण पावसाळी रेनकोट, मास्क आणि हेल्मेट घालून सोनसाखळी चोरीचे गुन्हे करत असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी या दोघांचा माग घेतला असता हे दोघे ठाणे घोडबंदर मार्गाने कल्याणच्या दिशेने जात असल्याचे फुटेजवरून आढळून आले. पोलिसांनी या मोटारसायकलचा शोध घेतला असता ही मोटारसायकल आंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर पार्क केलेली आढळून आली.
पोलीस पथकाने या मोटारसायकलवर पहारा देण्यासाठी चक्क झोमॅटो बॉयचा वेष परिधान करून सलग तीन दिवस मोटारसायकलवर पहारा ठेवला. या दरम्यान एक इसम ही मोटारसायकल घेण्यासाठी आला असता झोमॅटो बॉय बनलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याचा दुसरा साथीदार आंबिवली इराणी वाडीतील एका हॉटेलमध्ये थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
झोमॅटो बॉय बनलेले पोलीस आंबिवलीच्या हॉटेलवर आले व जेवणाची ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये येऊन टेबलवर बसलेल्या जाफर युसूफ जाफर याला ओळखून त्याच्या शेजारी जाऊन ‘चल जाफर तेरा ऑर्डर बन गया’ असे बोलून त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान तेथील स्थानिकांनी झोमॅटो बॉयच्या वेषात असलेल्या पोलिसांना विरोध करताच पोलिसांनी लोकांना आपली पोलीस असल्याची ओळख करून दिली व जाफरला अटक करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.