साखर सम्राट अभिजीत पाटील यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

144

कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद यांसह २४ ठिकाणी आयकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. अभिजीत पाटील यांची साखर सम्राट अशी ओळख आहे. त्यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे कोणालाच संशय आला नाही.

आयकर विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये छापा टाकण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या भागीदारीवरून कसून चौकशी करण्यात येत आहे. सोलापूर, पंढरपूरसह अनेक ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती करण्यात आली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह कार्यालय, कारखाने आणि पतसंस्थांवर छापेमारी करण्यात आली. पाटील यांचे अनेक साखर कारखाने आहेत. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह आयकर विभागाकडून पाटील यांच्या पंढरपूर, उस्मानाबाद, धाराशिव अशा अनेक ठिकाणच्या कारखान्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.

( हेही वाचा: कंत्राटी मुख्यमंत्रीवरुन उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…)

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यांवरदेखील आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. अभिजीत पाटील हेच या कारखान्यांचे चेअरमन आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील विठेवाडीमधील वसंतदादा साखर कारखान्यांवरही छापा टाकला.

अभिजीत पाटलांकडील साखर कारखाने

धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद), धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड), वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर) याशिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती जिंकल्याने हाही कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे. त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास ३ महिने तुरुंगवासही झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.