काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे आपण पक्ष सोडत असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे त्यामुळे त्यांची पुढील राजकीय भूमिका आता काय असणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
काय आहे भूमिका?
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आपण जम्मू-काश्मीरमध्ये परत जाणार असून आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. त्यामुळे आझाद आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माझ्या विरोधात गेल्या काही काळापासून मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवण्यात येत आहेत. पण माझ्याकडून अशी कोणतीही कृती केली जाणार नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः कंत्राटी मुख्यमंत्रीवरुन उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…)
राहुल गांधींवर टीका
शुक्रवारी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच पानी पत्र लिहून पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करताना गंभीर आरोप देखील केले आहेत. जेव्हापासून राहुल गांधींनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे आणि काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमधील सल्लागार तंत्राला नष्ट करत जुन्या व ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या फक्त आता नाममात्र राहिल्या आहेत, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
(हेही वाचाः शिवसेनेची संभाजी ब्रिगेड सोबत युती, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा)
काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्ही गोष्टी गमावल्या आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू करण्याची गरज आहे, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.
Join Our WhatsApp Community