रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या किना-यावर नुकत्याच सापडलेल्या संशयास्पद बोटीत AK-47 रायफल्स सापडल्या. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात देखील याच AK-47 रायफल्सचाच सर्वाधिक वापर करण्यात आला होता. या रायफल्सबाबत संपूर्ण जगामध्ये मोठी दहशत आहे.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केलेल्या अणूबॉम्बच्या हल्ल्यात सर्वाधिक नरसंहार झाल्याचे म्हटले जाते. पण त्याचबरोबर विविध हल्ल्यांमध्ये वापरल्या गेलेल्या AK-47 रायफल्समुळेही अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. ही रायफल आता दहशतवाद्यांच्या हातातलं खेळणं झाली असली, तरी त्याची निर्मिती सोव्हिएत रशियाचा एक साधा सोल्जर मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी दुस-या महायुद्धानंतर केली होती.
अशी झाली निर्मिती
रशियन सोल्जर मिखाईल कलाशनिकोव्ह हा दुस-या महायुद्धात सोव्हिएत सैन्यात टॅंक मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. 1941 मध्ये USSR वर जर्मन सैन्याने केलेल्या आक्रमणात कलाश्निकोव्ह जखमी झाला होता. यावेळी जर्मन सैन्याच्या उत्कृष्ट बदुंकांचा युद्धाच्या वेळी होणारा फायदा कलाश्निकोव्ह यांच्या लक्षात आला आणि त्यांनी सर्वात प्रभावी असे शस्त्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सोव्हिएत लष्करात असतानाच त्यांनी या रायफल्सचे विविध डिझाईन्स तयार केले होते. त्यातूनच AK-47 रायफलची निर्मिती झाली.
असे पडले नाव
कलाश्निकोव्ह यांच्या आडनावातील अद्याक्षरावरुन Automat Kalashnikov म्हणजेच AK असे या रायफलचे नाव ठेवण्यात आले आणि 1947 साली या रायफलचे पहिले मॉडेल विकसित करण्यात आले म्हणून या रायफलचे नाव AK-47 असे ठेवण्यात आले आहे.
लवकरच झाली प्रसिद्ध
या रायफलची उपयुक्तता लक्षात घेऊन 1949 मध्ये AK-47 ही सोव्हिएत सैन्याची असॉल्ट रायफल बनली आणि नंतर वॉर्सा करारानुसार (Warsaw Pact) इतर काही राष्ट्रांनी देखील याचा स्वीकार केला. इतकंच नाही तर या रायफलचा जगभरात प्रसार झाला. व्हिएतनाम,अफगाणिस्तान,कोलंबिया आणि मोझांबिक यांसारख्या देशांत तर ही रायफल क्रांतीचे प्रतीक बनले आहे.
कलाश्निकोव्ह यांनी या रायफलमध्ये अधिक सुधारणा करत 1959 मध्ये AKM हे नवीन रुप विकसित केले. यामध्ये AK-47 मधील मिल्ड रिसीव्हरच्या जागी स्टॅंप केलेल्या धातूचा वापर करण्यात आला त्यामुळे या रायफलचे वजन कमी झाले आणि ती हाताळायला सोपी झाली. सध्या या सुधारित रायफलचे उत्पादन आजही जगभरातील विविध देशांमध्ये सुरू आहे.
काय आहे वैशिष्ट्य?
AK-47 रायफल्स इतक्या वेगाने जगभरात प्रसिद्ध होण्यासाठी त्याची काही खास वैशिष्ट्ये कारणीभूत आहेत. या रायफलचे उत्पादन इतर रायफल्सपेक्षा तुलनेने स्वस्त आहे. तसेच ते वाहून नेण्यास हलके आणि वापरण्यास सोपे आहे. मुख्य म्हणजे थंडी आणि उष्णता अशा दोन्ही परिस्थितीत, पाणी साचलेल्या जंगलांपासून ते मध्य पूर्वेतील भीषण वाळवंटासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही ही रायफल उत्तमरित्या चालते.
रशियन सरकारकडून सन्मान
त्याच्या श्रमांसाठी, सोव्हिएत युनियनने कलाश्निकोव्हला स्टॅलिन पुरस्कार, रेड स्टार आणि ऑर्डर ऑफ लेनिनने सन्मानित केले. 2007 मध्ये, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी “आमच्या लोकांच्या सर्जनशील प्रतिभेचे प्रतीक” म्हणून कलाश्निकोव्ह रायफलचा उल्लेख केला. कलाश्निकोव्हचे 2013 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून रशियाची राजधानी मॉस्को येथे त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community