मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी अनिल देशमुख हे तुरुंगात चक्कर येऊन कोसळले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी परळ येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
प्रकृती अस्वास्थ्य
मुंबईतील हॉटेल व बार व्यावसायिकांकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यानंतर या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल केले असून अनिल देशमुख हे गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थर रोड तुरुंगात आहेत. शुक्रवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले व चक्कर येऊन ते खाली कोसळले.
उपचार सुरू
देशमुख यांना होत असलेला त्रास वाढल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान देशमुख यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असून, डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील असाच त्रास होत असल्यामुळे त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community