एसटी कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करा, शासनाप्रमाणे महागाई भत्ता द्या; मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

137

अत्यंत कमी वेतनावर राबणाऱ्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांची रखडलेली वेतन निश्चिती करुन त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांना गणपती आगमनापूर्वी खुशखबर; थकीत भत्ते खात्यात जमा होणार? )

६ महिने प्रदीर्घ संप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या काहीच मिळाले नाही. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रचंड मानहानी झाली. सध्या एसटी महामंडळ आपल्या परीने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करीत आहे. परंतु एसटीचा हाच कर्मचारी अत्यंत खचलेल्या आणि निराश मनस्थितीमध्ये काम करत आहे. त्यांना शासनाने दिलेली वेतनवाढ ही अनियमित व अत्यल्प असून, पूरक भत्ते आणि अनुषंगिक सुविधांसाठी त्याला पुन्हा आंदोलन करावे लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. सध्या प्रमाणापेक्षा महागाई वाढली आहे. घरभाडे, किराणा सामान, औषधोचार व मुलांच्या शिक्षणाचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. यावर एखादा अभ्यासगट किंवा समिती निर्माण केली पाहिजे. त्या समितीला मर्यादा ठरवून देत, अभ्यास पूर्ण अहवालाच्या आधारे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती पुरक भत्ते व अनुषंगिक सुविधांच्या बाबतीत निर्णय घ्यावा असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा

या बरोबरच गेली ३ वर्ष एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांना गणवेश किंवा गणवेशाचे कापड दिले गेले नाही. ते कापड त्यांना तातडीने द्यावे, याशिवाय शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा. अशी मागणीही बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम त्वरित दिली पाहिजे कारण स्वतः व कुटुंबातील सदस्यांच्या औषधोचारासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या राहण्या- जेवण्याची प्रचंड गैरसोय होत असून, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीने लक्ष घालून त्यांच्यासाठी चांगली विश्रांती गृहे व सुविधा निर्माण करण्यासाठी दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करून द्यावा अशी विनंती सुद्धा बरगे यांनी केली आहे.

महामंडळाच्या बसेसची अवस्था बिकट

एसटी महामंडळाकडे सध्या ज्या बसेस उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांश बसेसची अवस्था अत्यंत बिकट आहे. काही बसेसची आयुमर्यादा संपली आहे. नव्या बसेस घेण्याकरिता महामंडळकडे निधी नाही. त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण पुरेशा प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना चांगली सेवा देता येत नाही व महामंडळाचे उत्पन्न कमालीचे कमी झाले आहे. यामुळे महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे. महामंडळाच्या बस, बस स्थानके व इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामधे असलेली चालक वाहक व कार्यशाळा विश्रांती गृहे यांची पडझड व दुरावस्था झाली आहे. कार्यालयीन इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.